
नागपूर : सुरेल स्वर, जुन्या गीतांची जादू आणि संगीताचा आनंद अशा वातावरणात वसंत प्रभा म्युझिक अकॅडमीतर्फे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या गीतांचा विशेष कार्यक्रम ‘सुरों की महफिल’ आयोजित करण्यात आला. 21 नोव्हेंबर रोजी जवाहरनगर येथील स्टुडिओमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी आशा भोसले यांच्या लोकप्रिय हिंदी आणि मराठी गीतांची बहारदार प्रस्तुती करत त्यांना संगीतमय अभिवादन केले.
अकॅडमीच्या संचालिका सौ. संगीता गावंडे यांच्या आयोजनाखाली झालेल्या या कार्यक्रमात ‘साथी रे भूल ना जाना’, ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’, ‘शरारा शरारा’, ‘क्या गजब करते हो जी’ यांसारख्या लोकप्रिय गीतांनी संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गीताच्या प्रस्तुतीत विद्यार्थिनींनी आपल्या गायन कौशल्याची छाप पाडली. कार्यक्रमाला आदरणीय वृंदाताई ठाकरे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी कलाकारांचे कौतुक करत त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाची सांगता ‘चांदणे शिंपीत जाशी’ या सुरेल गीताने करण्यात आली. विद्यार्थिनींच्या मेहनतीला, सरावाला आणि संगीतावरील प्रेमाला या कार्यक्रमातून सुंदर व्यासपीठ मिळाले.


