
नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरी लवकरच लगीनघाई सुरू होणार आहे. त्यांची कन्या रेवती सुळे हिचा नागपूरचे सारंग लखानी यांच्याशी विवाह ठरल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी ही आनंदवार्ता समोर आली.
रेवती आणि सारंग यांच्या साखरपुड्याची बातमी सर्वप्रथम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर केली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः रेवती व सारंग यांचे छायाचित्र शेअर करत लग्न ठरल्याची माहिती दिली. या घोषणेनंतर सुळे कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी या नात्याबाबत मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, “रेवती आणि सारंग गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखतात. अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. माझे सहा भाऊ आहेत आणि सर्वांनी या नात्याला आशीर्वाद दिला. दादा (अजित पवार) असतानाच हे लग्न ठरलं, हे माझं भाग्य आहे.”
भावनिक होत त्या पुढे म्हणाल्या, “दादाचं २८ जानेवारीला निधन झालं. अन्यथा ३० जानेवारीला संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन ही घोषणा करणार होतं. मात्र दादाच्या आशीर्वादानेच हे नातं ठरलं, याचं समाधान आहे.”
कोण आहेत नागपूरचे सारंग लखानी?
सारंग लखानी हे नागपूरचे रहिवासी असून ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी आणि वंदना लखानी यांचे सुपुत्र आहेत. ते स्वतःही उत्तम बॅडमिंटनपटू असल्याची माहिती आहे. रेवती सुळे या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील असल्या तरी त्या राजकारणापासून दूर राहतात. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मास्टर्स शिक्षण पूर्ण केले आहे.लग्न ठरल्याची अधिकृत घोषणा झाली असली तरी विवाहाची तारीख आणि मुहूर्ताबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.








