
मुंबई : गेल्या वर्षी १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताबाबत इटालियन दैनिक *‘कोरीएरे डेला सेरा’*ने धक्कादायक दावा केला आहे. ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे नव्हे, तर “जाणूनबुजून केलेल्या कृतीचा परिणाम” असल्याचा निष्कर्ष तपासकर्त्यांनी काढल्याचे वृत्त नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील दोन सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले आहे. मात्र, डीजीसीए किंवा एएआयबीकडून अंतिम अधिकृत अहवाल अद्याप जाहीर झालेला नसल्याने या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
काय सांगतो मीडिया रिपोर्ट?
इटालियन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, अपघाताच्या वेळी विमानाच्या इंजिनचा इंधन पुरवठा बंद करण्यात आला होता आणि हा यांत्रिक दोष नसून मानवी हस्तक्षेपाचा परिणाम असल्याचे तपासात आढळले आहे. चौकशीत मदत करणाऱ्या अमेरिकन तज्ज्ञांनी या निष्कर्षांना “ब्रेकथ्रू” असे संबोधल्याचा दावा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांकडून अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही वृत्तात नमूद आहे.
अपघाताची पार्श्वभूमी-
एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांतच कोसळले होते. या दुर्घटनेत २६० जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रवासी, हवाई कर्मचारी तसेच विमान ज्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर कोसळले त्या ठिकाणच्या व्यक्तींचाही समावेश होता. या अपघातातून केवळ एकच प्रवासी बचावला.
प्राथमिक अहवालातील उल्लेख-
जुलै २०२५ मध्ये भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB)ने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील संभाषणाचा उल्लेख करण्यात आला होता. एका पायलटने “तुम्ही इंधन का कापले?” असा प्रश्न विचारल्याचे, तर दुसऱ्याने “मी तसे केले नाही” असे उत्तर दिल्याचे नमूद करण्यात आले होते.
ब्लॅक बॉक्स डेटाच्या प्राथमिक विश्लेषणात यांत्रिक बिघाड नाकारण्यात आला असून, इंजिन इंधन नियंत्रण स्विचच्या मॅन्युअल हालचालींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी दोन्ही इंजिन बंद असल्याचेही स्पष्ट झाले होते.
वैमानिकांबाबत दावा-
इटालियन दैनिकाच्या मते, तपासकर्त्यांना संशय आहे की कॅप्टन सुमित सभरवाल (पायलट-इन-कमांड) किंवा फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांपैकी एकाने इंधन स्विच बंद केला असावा. तथापि, जबाबदारी अद्याप निश्चित झालेली नाही. काही वृत्तांमध्ये कॅप्टन सभरवाल यांच्या मानसिक आरोग्याबाबत दावे करण्यात आले आहेत; मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावत नव्याने सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पुढील शक्यता-
अंतिम अहवालात वैमानिकांच्या मानसिक आरोग्य तपासणी आणि सातत्यपूर्ण मूल्यांकनासंदर्भात शिफारशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातानंतर तांत्रिक बिघाडापासून मानवी चुकांपर्यंत विविध सिद्धांत समोर आले; मात्र तपासकर्त्यांचे लक्ष आता कॉकपिटमधील इंधन नियंत्रण प्रणालीवर केंद्रित झाले आहे. दरम्यान, अंतिम अधिकृत अहवाल येईपर्यंत कोणताही ठोस निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विमान सुरक्षा व्यवस्थेबाबत या प्रकरणामुळे पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.








