रामटेक -राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. निवडणुकीच्या काळात काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील मतभेद पुन्हा समोर आले असून रामटेक मतदारसंघात याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराविरोधात काँग्रेस बंडखोराला स्थानिक नेते जाहीरपणे पाठिंबा देत आहेत. अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांच्या प्रचारासाठी काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे आणि माजी मंत्री सुनील केदार गावोगावी फिरत आहेत. याबाबत सुनील केदार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपण बंडखोरांना साथ देत असल्याचे म्हटले आहे.
उद्धवजी, आम्ही एवढे सांगतो, ज्या माणसाने तुमचे मीठ खाल्ले, तुमचा जो अपमान केलेला आहे. त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे. आशिष जैस्वाल यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली त्या अपमानाचा बदला आम्ही घेऊ. मी आणि श्यामकुमार बर्वे यांनी बसून निर्णय घेतला. आशिष जैस्वाल यांना सत्तेचा माज आला आहे, असे केदार म्हणाले.