
नागपूर – शहरातील प्रत्येकाला सर्वोत्तम नगरी सुविधा मिळाव्यात, नागपूरचा सुखांक मोठा व्हावा हीच माझी इच्छा आहे. स्थिर नेतृत्व, पारदर्शक कारभार आणि विकासाची गती कायम ठेवायची असेल तर येणाऱ्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपा–शिवसेना महायुतीला मत द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
प्रभाग क्रमांक ३७ मधील महायुतीचे उमेदवार निधी तेलगोटे, प्रा. दिलीप दिवे, अश्विनी जिचकार आणि संजय उगले यांच्या प्रचारार्थ राधे मंगलम येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक व विविध परिवार संस्था संवाद बैठकीत ते बोलत होते. त्याचवेळी प्रभाग क्रमांक ३८ मधील आनंद नितनवरे, प्रतिभा राऊत, माहेश्वरी पटले, प्रभाग ३५ मधील संदीप गवई, पूजा भुगावकर, विशाखा मोहोड, रमेश भंडारी, प्रभाग ३६मधील अमोल श्यामकुळे, माया हाडे, शिवानी दाणी, ईश्वर ढेंगळे तसेच प्रभाग २८ मधील विजय झलके, नंदा येवले, नीता ठाकरे, किरण दातीर यांच्या प्रचारार्थ देखील गडकरी यांनी संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर महानगर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी, महामंत्री रितेश गावंडे, माजी महापौर नंदाताई जिचकार, माजी जि. पं. अध्यक्ष संध्याताई गोतमारे, नितीन महाजन, माजी उपमहापौर राजाभाऊ लोखंडे, शंकरराव भुते, रवीजी मुन्ने, शंकर पहाडे, विवेक तरासे, प्रभाग संयोजक विमलकुमार श्रीवास्तव, सहसंयोजक अजय डागा, योगेश थापे, प्रदीप चौधरी, अतुल गेडाम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘रिंग रोड, पाण्याच्या टाक्या, 24 तास पाणीपुरवठा अश्या अनेक विकास कामांसाठी मी व भाजपच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. काम पूर्ण केले. सर्वाधिक सिमेंट रस्ते नागपूर शहरात आहेत; ड्रेनेज, पाणीपुरवठा, उद्याने, आरोग्य आणि शिक्षण त्यासाठी सिम्बॉयसिस, नरसी मोन्जी, ट्रिपल आयटी आणले. आरोग्य क्षेत्रात सातत्याने व दर्जेदार काम झाले आहे. एम्स, एनसीआय, उत्तम वैद्यकीय सेवा आपण सुरु केल्या. अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रकल्प प्रत्यक्षात उतरले असून योजना केवळ कागदावर न राहता जमिनीवर आल्या, याचे विशेष समाधान वाटते.’
महानगरपालिकेच्या कारभाराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ई-टेंडरिंग, ऑनलाईन सेवा आणि थेट लाभ हस्तांतरण यामुळे महापालिकेचे कामकाज अधिक पारदर्शक झाले आहे. उत्तम दळणवळण सेवा नागपुरात आहे. करदात्याच्या पैशाचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणे हा भाजपचा कायमचा आग्रह राहिला आहे.
केंद्र–राज्य–महापालिका यांच्यातील समन्वयावर भर देताना गडकरी म्हणाले, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे निधी उपलब्धता, मंजुरी आणि प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने होते. या समन्वयाचा प्रत्यक्ष लाभ नागपूरकरांनी अनुभवला आहे. सर्वसमावेशक विकासाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, झोपडपट्ट्यांपासून सुसज्ज वस्त्यांपर्यंत सर्वांसाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, महिला व युवकांसाठी योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भाजपने भर दिला आहे.
शेवटी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, सक्षम नेतृत्व, अनुभवी नगरसेवक, अभ्यासू प्रशासकीय दृष्टिकोन आणि मैदानात सतत काम करणारी कार्यकर्त्यांची टीम यामुळे भाजपचे निर्णय जलद आणि परिणामकारक ठरतात. पुढील पाच वर्षांचा स्पष्ट विकास आराखडा भाजपकडे तयार असून, नागपूरकरांनी संधी दिल्यास त्या संधीचे निश्चितच विकासात रूपांतर केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘या’ कारणाने वाढला मनपा शाळांचा दर्जा –
नागपुरातील महानगरपालिकांच्या शाळांचा दर्जा अतिउत्तम करण्यामध्ये प्रा. दिलीप दिवे यांचे विशेष योगदान आहे, असा उल्लेख ना. गडकरी यांनी यावेळी केला. दलित आणि गरीब वस्त्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण सभापती म्हणून दिलीप दिवे यांनी सीबीएससी किंवा इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू होण्याकरिता सातत्याने दिल्ली, मुंबई येथे येऊन पाठपुरावा केला होता असेही गडकरी यावेळी म्हणाले.








