नागपूर : भारत-पाकिस्तान सीमारेषा ओलांडून कारगिल मार्गे पाकिस्तानमध्ये पोहोचलेल्या नागपूरच्या सुनीता जामगडे प्रकरणात आता एक नवे कायदेशीर वळण आले आहे. कारगिल पोलिसांनी सुनीता विरोधात विशेष कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तिला पुढील तपासासाठी कारगिलला नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने नागपूर न्यायालयाने तिचा प्रोडक्शन वॉरंट देण्यास नकार दिला आहे.
यामुळे कारगिल पोलिसांना सुनीता जामगडे हिला न घेताच परतावे लागले. पोलिसांकडे स्थानिक न्यायालयाची संमती नसल्यामुळे ही अडचण निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, कारगिल पोलिस पुन्हा पुढच्या आठवड्यात योग्य कागदपत्रांसह न्यायालयात प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज करणार आहेत.
दरम्यान, सध्या सुनीता जामगडे न्यायिक कोठडीत असून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तिच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. नागपूर पोलीस आणि कारगिल पोलीस यांच्यात या प्रकरणात सातत्याने समन्वय सुरू आहे. नागपूर पोलिसांनी सांगितले की, कारगिल पोलिसांशी त्यांचा सुरुवातीपासूनच संपर्क आहे आणि सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, घडलेल्या घटनेची सखोल पडताळणी करण्यासाठी सुनीता हिला घटनास्थळी नेऊन घटनाक्रमाचे ‘रिक्रिएशन’ करणे आवश्यक आहे. त्यासाठी तिला कारगिलला नेण्याची प्रक्रिया पूर्ण करताना आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली जात आहे.
या प्रकरणाकडे आता संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले असून, पुढील आठवड्यात होणाऱ्या न्यायालयीन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.