Published On : Thu, Jun 11th, 2020

सुनील शिंदे प्रयोगशील शेतकरी नेता : नितीन गडकरी

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे तसेच काटोलचे माजी आमदार सुनील शिंदे यांचे निधनाचे मला अतीव दु:ख असून त्यांच्या निधनाने एक प्रयोगशील शेतकरी आपल्यातून गेला असल्याची भावना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

सुनील शिंदे हे संत्रा उत्पादक शेतकर्‍यांचे नेते होते. शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठ़ी ते दरवर्षी हिवाळी अधिवेशनात आमदार आणि मंत्र्यांना फुकट संत्री वाटप करीत असत. सावरगाव परिसरातील मुलींना साक्षर करण्यासाठी त्यांनी विशेष शाळा सुरु केली होती.

ही शाळा विदर्भात आदर्श अशी शाळा ठरली होती. काटोल विधानसभा क्षेत्राचे दोनदा प्रतिनिधित्व करणारे शिंदे हे म्हाडाचे अध्यक्षही राहिले आहेत. सरकारी जमिनी लाटण्याप्रकणी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे अनेकांना जमिनी परत कराव्या लागल्या होत्या. असा लढाऊ नेता आज आपल्यात नाही याचे दु:ख आहे, असेही गडकरी म्हणाले.