Published On : Mon, Apr 16th, 2018

वेगळ्या विदर्भशिवाय आत्महत्या थांबणार नाही

Advertisement

vidarbha

नागपूर: शेतकरी ज्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे, ते जगासमोर आणण्यासाठी साहेबराव पाटील यांनी 19 मार्च 1986 रोजी आत्महत्या त्यांनी केली होती. तेव्हापासूनचे सरकारचे धोरण अजुनही बदललेले नाही. आत्महत्या वाढतच आहेत. वेगळ विदर्भ झाल्याशिवाय शेतकèयांची स्थिती सुधारणाार नाही, असे मत आत्महत्या केलेले शेतकरी साहेबराव पाटील यांचे बंधू प्रकाश पाटील यांच्या पत्नी छाया पाटील यांनी व्यक्त केला.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसèया राष्ट्रीय अधिवेशनाचे सोमवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात प्रकाश पाटील व छाया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप होते तर व्यासपीठावर मुख्य संयोजक राम नेवले, आर. एस, रुईकर संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास खांदेवाले, धनंजय धार्मिक, प्रबीर चक्रवर्ती, डॉ. जी. एस. ख्वाजी, अ‍ॅड. नंदा पराते, विजया धोटे, राजकुमार तिरपुडे, अरुण केदार, ओंकार बुलबले, गोविंद भेंडारकर, आत्महत्याग्रस्त शेतकèयांच्या कुटूंबातील प्रतिनिधी प्रकाश राठोड, गोपाल दाभाडकर, दत्ता राठोड, सुमन सरोदे, त्रिवेणाबाई गुल्हाणे, विठ्ठल राठोड, पारोमिता गोस्वामी, इंद्रजित आमगावकर, स्वतंत्र कोकण आंदोलनाचे अभ्यासक, प्रतिनिधी भाऊ पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

साहेबराव पाटील यांनी कशा परिस्थितीमध्ये आत्महत्या केली हे सांगताना छाया पाटील भावूक झाल्या होत्या. साहेबरांवानी कुटुंबासह आत्मबलीदान केले आहे. भारत कृषीप्रधान असून बहुतेक कुटूंब शेतीवर अवलंबून आहेत. अवाढव्य लोकसंख्या असलेल्या या देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही हजारो गावांमध्ये ज्ञानगंगा, विकासाची गंगा पोहोचली नाही. कष्टकरी, मजूर, कारागीरांची अवस्था उसाच्या चिपाडापेक्षाही दयनीय झाली आहे. सावकारी पाश, महागाईमुळे गरीबी पाचवी पुजली आहे. साहेबराव उच्च शिक्षित होते, सरपंच होते, त्यांना कीर्तनाची आवडही तरी त्यांनी कुटूंबासह आत्महत्या केली. शेतकèयांच्या जीवनासाठी त्यांनी सामूहिक आत्महत्या केली, असे त्या म्हणाल्या.

वैशिष्ट्यपूर्ण स्मरणिका
सद्यस्थिती व विदर्भाची मागणी या विषयावरील स्मरणिकेचे याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. स्मरणिकेचे संपादन डॉ. श्रीनिवास खांदेवाले, किशोर पोतनवार, पुरूषोत्तम पाटील, विजया धोटे, विष्णू आष्टीकर, राजेंद्र आगरकर यांनी केले आहे. डॉ. खांदेवाले
म्हणाले, ही समितीची तिसरी स्मरणिका असून पहिल्या स्मरणिकेच्या तुलनेत लेखकांची संख्या वाढली आहे. बुलढाणा ते गडचिरोलीपर्यंत सर्व कार्यकते लिहिले झाले आहे. समिती केलेल्या प्रबोधन व लोकांना संघटीत करण्याच्या कामाचे हे यश आहे. ही स्मरणिका मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू अशा चार भाषांमध्ये असून मुस्लीम घरांपर्यंत विदर्भाचा संदेश पोहोचावा यासाठी ख्वाजी यांनी उर्दूत लेख लिहिला आहे. रुईकर इन्स्टीट्यूटने अहवाल, अखिल भारतीय समाजवादी पक्षाचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे ऐतिहासिक पत्र, विधानसभा सदस्य टी. जी. देशमुख यांची विधानसभेतील भाषणांचे संपादित अंश यात वाचायला मिळतील. स्मरणिकेचे मुखपृष्ठ विशेष असून त्यात लोकांचा विकास दर्शविण्यात आला आहे.

घोषणा आणि ठराव
अधिवेशनाचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप यांनी यावेळी रुईकर इन्स्टिट्यूटने दोन वर्ष अखंड परिश्रम करून विदर्भाच्या सर्व बाजुच्या अभ्यासाचा तयार केलेल्या अहवालाला इंग्रजी व मराठीत प्रकाशित करण्याची आयसीएसएसआरने शिफारस केली व त्यासाठी अनुदान देऊ केल्याची घोषणा केली. सोबतच, त्यांनी रणजी ट्राफी खचून आणणाèया विदर्भातील क्रिकेटपटूच्या अभिनंदाचा तसेच, प्रा. सुरेश द्वादशीवार यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, गडचिरोली जिल्ह्यात जनसेवेचे कार्य करणाèया डॉ. अभय व राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला.

नवीन राज्य निर्मितीचे नियम हवेत
डॉ. श्रीनिवास खांदेवाले सद्यस्थिती व विदर्भाची मागणी विषयावर भाष्य करताना म्हणाले, हजारो शेतकèयांच्या आत्महत्या होत असूनही देशातील राज्यव्यवस्था, शासकीय व्यवस्था, कृषी व्यवस्था बदलत नाही. कर्ज माफ केल्या, कमी व्याजाने कर्ज दिल्याने प्रश्न सुटणार नाहीत. जागतिकीरणानंतर सगळ्या देशाचे बाजार मोकळे होतील, रोजगार निर्मिती होईल, सुबत्ता येईल असे म्हटले जात होते पण बावीस-पंचेवीस वर्षानंतर सुबत्ता आली नाही, रोजगार मिळाला नाही, शेतीची अवस्था अशी खराब आहे. विदर्भाचे आंदोलन अहिंसक राहिले पाहिजे असे म्हणतात पण हिंसेशिवाय प्रश्न सुटत नाही, असेही काहींचे मत आहे. शांततेने विदर्भाचे आंदोलन करायचे की हिंसा करायची हे ठरवले पाहिजे. 1950 पासून आतापर्यंत वेगळ्या राज्यासाठीचे असे काही नियमतच नाही. लोकांनी फक्त मरावे पण आम्ही राज्य देणार नाही. नवीन राज्य निर्माण करण्याचे काही नियम पाहिजेत, यासाठी राज्यकर्त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. तशी मागणी संसद सभापती, पंतप्रधान यांकडे मागणी केली पाहिजे.

अभ्यासपूर्ण अहवाल
जी. एस. ख्वाजा यांनी रुईकर इन्स्टिट्यूट अहवालासंदर्भात माहिती दिली. हा अहवाल अभ्यासपूर्ण रितीने तयार करण्यात आला असून त्यासाठी सखोल संशोधन करण्यात आले. विदर्भाचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक शोषण कसे झाले याची सविस्तर माहिती यात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार खोटे वादे आणि दावे करते आहे, त्यात काही तथ्य, हे हा अहवाल सांगतो. विदर्भात सर्वात जास्त बेरोगजारी गरिबी आणि आत्महत्या झाल्या आहेत. त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक समित्या आल्या. पण त्यावर उत्तर नाही मिळाले. अशी संदर्भासह सर्व माहिती यात उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणाात अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, काही झाले तरी एकदा स्वतंंत्र विदर्भाचे राज्य हे माझे स्वप्न आहे, हे माझे स्वातंत्र आहे, असा संदेश बंधूभगिनींनी येथून घेऊन जावा. प्रास्ताविक राम नेवले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मंजुषा ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन कैलाश फाटे यांनी मानले

जय विदर्भ च्या घोषणा
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसèया अधिवेशनाला जय विदर्भच्या घोषणांनी प्रारंभ झाला. विदर्भाच्या आंदोलनात सक्रीय असलेल्यांनी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात उद्घाटन कार्यक्रमादरम्यान वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, आपले राज्य विदर्भ राज्य, असा कसा होत नाही झाल्याशिवाय राहत नाही अशा विविध घोषणांनी सभागृह दणाणले.