Published On : Mon, Oct 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पदवीधर मतदारसंघात सुधाकर कोहळेंचा विजय निश्चित; बावनकुळेंचा दावा

अनिल सोले यांची नाराजी दूर करू; दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याचेही बावनकुळे म्हणाले
Advertisement

नागपूर, : नागपूर पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या निवडणुकीत ही जागा जिंकता आली नव्हती; मात्र यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करत असल्याने कोहळे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, दुष्काळ, पाणीटंचाई, आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन, महायुतीतील जागावाटप आणि इतर विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली.

अनिल सोले यांची नाराजी दूर करू

भाजपचे माजी आमदार अनिल सोले उमेदवारीवर नाराज असल्याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, त्यांची नाराजी काही काळापुरती असू शकते. त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करून नाराजी दूर केली जाईल. सोले आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

अमरावतीच्या जागेबाबत महायुतीत चर्चा

अमरावती विधानपरिषद मतदारसंघाबाबत महायुतीच्या बैठकीत चर्चा झाली असून ही जागा शिवसेनेने लढवावी, असा विचार मांडण्यात आला आहे. मात्र अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच महायुतीतील संबंधित पक्षांचे अध्यक्ष संयुक्तपणे करतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर

राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. सोयाबीन आणि कापसाचे मोठे नुकसान झाले असून मक्यालाही फटका बसला आहे. रब्बीचे पीक घेणेही अवघड होण्याची शक्यता आहे. पुढील काळात चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला असून पीक विमा तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या माध्यमातून मिळणारी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

चारा टंचाई टाळण्यासाठी नियोजन

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नियोजन सुरू आहे. ज्या भागात ओलावा उपलब्ध आहे, तिथे **‘माता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजने’**अंतर्गत चारा लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. वैरण विकासाची कामेही हाती घेण्यात आली आहेत.

विदर्भातील मोठ्या वनक्षेत्राचा वापर करून चारा निर्मिती करण्याचे नियोजन आहे. यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसोबत झुणका-भाकर, ठेचा

शेतकऱ्यांसोबत केलेल्या जेवणाबाबत बावनकुळे म्हणाले की, हा पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता. शेतकरी डबा घेऊन आले होते आणि भेटीदरम्यान त्यांनी प्रेमाने जेवणाची विनंती केली. त्यानंतर शेतकऱ्यांसोबत झुणका-भाकर आणि ठेचा खाल्ला.

दुष्काळाच्या संकटात शेतकरी दुःखी असला तरी त्याने आपले संस्कार आणि पाहुणचाराची परंपरा विसरलेली नाही, असे बावनकुळे म्हणाले.

तांदूळ घोटाळ्याच्या अहवालानंतर कारवाई

तांदूळ घोटाळ्याच्या चौकशीत कोणी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. चौकशीत गंभीर बाबी आढळल्यास फौजदारी गुन्हेही दाखल केले जाऊ शकतात, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांना ट्रोल करणे, मारहाण करणे चुकीचे

महिला संपादकाला करण्यात आलेल्या ट्रोलिंगबाबतही बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार जपले पाहिजेत. महिला संपादकाला अशा प्रकारे वागणूक देणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही, असे ते म्हणाले.

ट्रोल करणाऱ्या व्यक्तींचा पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करावी. पत्रकारांना मारहाण करणे किंवा ट्रोल करणे योग्य नसून पोलिसांनी या प्रकरणात कठोर भूमिका घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन लोकशाही मार्गाने व्हावे

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बावनकुळे म्हणाले की, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र आंदोलन लोकशाही पद्धतीने झाले पाहिजे. सरकारी मालमत्ता किंवा समाजाचे नुकसान होणार नाही, याची काळजी आंदोलकांनी घेतली पाहिजे. आंदोलन आक्रमक असले तरी तोडफोड करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

पाणी नियोजनात पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य

पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीवर सरकारकडून नियोजन सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. प्रत्येक शहरातील पाण्याची उपलब्धता आणि गरज याचे आकलन करून त्यानुसार एसओपी तयार केली जात आहे. पाण्याच्या वापरात सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीत चर्चेतून जागावाटप

महायुतीमध्ये जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. काही वेळा एखाद्या पक्षाला आघाडी मिळते, तर काही वेळा दुसऱ्या पक्षाला; मात्र महायुतीत चर्चेतून निर्णय घेतले जातात. विद्यमान जागा संबंधित पक्षानेच लढवाव्यात, या ‘सिटिंग-गेटिंग’ तत्त्वाचा प्राथमिक विचार असून उर्वरित जागांबाबत सामंजस्याने निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे म्हणाले.

माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत बंडखोरीवर चर्चा

काही जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत परिस्थिती बदलू शकते. ज्या ठिकाणी बंडखोरी झाली आहे, तिथे संबंधित उमेदवारांशी चर्चा करून त्यांना अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त करण्याचे प्रयत्न केले जातील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर आरोप-प्रत्यारोप नको

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, धावपट्टीत काही समस्या निर्माण झाली असेल किंवा भविष्यात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता असेल, तर तिची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती दुरुस्ती करण्याला प्राधान्य दिले पाहिजे; त्यावर आरोप-प्रत्यारोप करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.