Published On : Mon, Sep 25th, 2017

सुधा चंद्रन यांच्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले


नागपूर: प्रसिध्द अभिनेत्री व शास्त्रीय नृत्य कलाकार सुधा चंद्रन यांच्या विविध प्रकारच्या नृत्याने आज कोराडी महोत्सवात रसिकांना आणि भाविकांना मंत्रमुग्ध केले. हजारो रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली असताना त्यांना आपल्या नृत्याच्या जोरावर एकाच जागेवर सुधा चंद्रन यांनी खिळवून ठेवले होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सौ. ज्योती बावनकुळे, आशिष फडणवीस व अनेक मान्यवरांनी आज या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

वयाच्या सोळाव्या वर्षीच अपघातात एक पाय अधू झाल्यानंतरही जिद्दीने, हिंमतीने आणि प्रचंड महत्त्वाकांक्षेमुळे सुधा चंद्रन यांनी नृत्यात आपले संपूर्ण जगभर वर्चस्व असल्याचे सिध्द करून दाखविले. एका महत्त्वाकांक्षी नृत्याचा आविष्कार आज त्यांच्या नृत्यातून रसिकांना पाहायला मिळाला. एक पाय अधू असतानाही त्यांच्या नृत्यात कुठेही कमीपणा जाणवला नाही. कोराडी येथे त्यांनी संतोषी माता, शिवनृत्य, गंगा, नाचे मयुरी अशी अनेक प्रकारची पण धार्मिक संदर्भ असलेली नृत्ये सादर करून रसिकांची मने जिंकली. पायाने अधू असलेली ही अभिनेत्री नृत्यात पारंगतच झाली नाही तर कुणाचाही आधार न घेता सक्षमपणे आपल्या पायावर उभी झाली.

अनेक मालिका, चित्रपटांमधून अभिनय आणि नृत्य सादर करून आपण कुठेही कमी नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. आजच्या कार्यक्रमातही सुधा चंद्रन यांच्या नृत्याला उपस्थितांची वाहवा मिळत होती. एकदंताय वक्रतुंडाय….. या गीतापासून त्यांनी आज आपल्या नृत्य सादरीकरणाला सुरुवात केली. कोराडी महोत्सवाच्या भव्य दिव्य मंडपात आज रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच जगदंबेची महाआरती करण्यात आली.

मुख्यमंत्री आणि मनोज तिवारी
उद्या दिनांक 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता कोराडी सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात येईल. तसेच उद्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे जस गीत गायक मनोज तिवारी हे आहेत. गेल्या वर्षी मनोज तिवारी यांच्या गायनाने रसिकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. रसिकांशी संवाद करीत तिवारी यांनी गेल्या वर्षी अनेक गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली होती. उद्याही या जस गीत गायनाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.