Published On : Fri, Jan 17th, 2020

पल्स-पोलिओ मोहीम नागपुरात यशस्वी करा : डॉ.सोनकुसळे

Advertisement

– टास्क फोर्सची बैठक : विविध संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत १९ जानेवारी रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. नागपूर पोलिओमुक्त झाले आहे. भविष्यात पोलिओचा कुठलाही रुग्ण आढळू नये यासाठी पल्स पोलिओ अभियानात संबंधित सर्व शासकीय संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करून अभियान यशस्वी करा, असे आवाहन आरोग्य उपसंचालक आणि आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. भावना सोनकुसळे यांनी केले.

Advertisement

१९ जानेवारी रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची माहिती देण्यासाठी आणि ती यशस्वी करण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्यासाठी नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात टास्क फोर्सच्या बैठकीचे आयोजन गुरुवारी (ता. ९) करण्यात आले होते. बैठकीला आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांच्यासह अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, पल्स-पोलिओ मोहिमेचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने एसएमओ डॉ. साजीद खान, आयएपीचे सचिव डॉ. मुस्तफा, आयएमएच्या सचिव डॉ. गिरी, रोटरी इंटरनॅशनलच्या अध्यक्ष टॉबी भगवागर यांच्यासह विविध विभाग आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे एसएमओ डॉ. साजीद खान यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. नागपुरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक या पल्स पोलिओ लसीपासून वंचित राहू नये यासाठी सर्वच स्तरावर प्रसिद्धी आणि जनजागृती करणे आवश्यक आहे. कामगारांच्या वस्त्या, रेल्वे स्थानक, बस स्थानक, प्रत्येक वस्तीमध्ये या मोहिमेचा संदेश जाणे गरजेचे आहे. त्यासाठी टास्क फोर्समधील प्रत्येक सदस्यांनी मिळून सामूहिक प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पल्स पोलिओ मोहिमेचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी नागपुरात १९ जानेवारी रोजी आयोजित मोहिमेची आणि त्यासाठी नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती दिली. मोहिमेच्या दिवशी १० झोनल वैद्यकीय अधिकारी, १० स्वास्थ निरीक्षकांच्या माध्यमातून नियोजित ठिकाणी आणि घरोघरी भेट देऊन पल्स पोलिओ कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करतील, अशी ग्वाही दिली.

असे राहील नियोजन
१९ जानेवारी रोजी आयोजित मोहिमेसाठी २,७६,४७३ बालक लाभार्थी राहतील. यासाठी संपूर्ण नागपूर शहरात १० झोनअंतर्गत १३०१ बुथ राहणार असून यासाठी ३५५६ मनुष्यबळ कार्यरत राहील. २५८ सुपरवाईजर यावर नियंत्रण ठेवतील. ट्रांझीट टीम मंदिर, मस्जिद, मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमानतळ व मोबाईल टीमद्वारे अतिजोखीमग्रस्त भाग, बांधकाम, वीटभट्ट्या, भटक्या जमातीचे मुले, रस्त्यावरील मुले, अनाथालये यामधील मुलांना पोलिओ डोज पाजण्याची व्यवस्था करतील. झोपडपट्टी, स्मॉल फॅक्टरी एरिया व इतर ठिकाणी पोलिओ डोज पाजण्याची सोय उपलब्ध आहे. २१ ते २५ जानेवारी दरम्यान प्रत्येक दिवशी १०५७ टीम शहरातील ७,३६,५९९ घरांना भेटी देतील. पल्स पोलिओ अभियान १९ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत राहील.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement