Published On : Sat, Apr 7th, 2018

अनुसूचित जातीच्या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक – डॉ.स्वराज विद्वान

Advertisement

मुंबई: अनुसूचित जातीसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत देण्यात आलेला निधी 99 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करण्यात आल्याचे दिसून येत असून ही बाब समाधानकारक आहे, असे केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ.स्वराज विद्वान यांनी आज येथे सांगितले.

अनुसूचित जातीसाठी मुंबई शहर जिल्हा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी बन्सी गवळी, निवासी उप जिल्हाधिकारी संपत डावखर, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार उपस्थित होते.

डॉ.विद्वान पुढे म्हणाल्या, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग त्यांच्याकडे आलेल्या अनुसूचित जातीच्या घटकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांना न्याय मिळवून देण्याचे काम करते. अनुसूचित जातीच्या घटकासाठी राबविण्यात आलेल्या योजना कशा प्रकारे राबविल्या जातात याचे निरीक्षण करते. मुंबई शहराचा आढावा घेतला असता अनुसूचित जातीच्या घटकावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण अत्यल्प आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना प्रशंसनीय आहे. तसेच आंतरजातीय विवाहासाठी 240 दाम्पत्यांना प्रोत्साहन म्हणून प्रती दाम्पत्य 50 हजार रुपये अनुदान देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.