Published On : Fri, Feb 5th, 2021

‘वंदेमातरम्‌ हेल्थ पोस्ट’साठी आठ दिवसांत जागांचे प्रस्ताव सादर करा

Advertisement

महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश : विविध आरोग्य योजनांचा घेतला आढावा

नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात साकारण्यात येणाऱ्या ७५ वंदेमातरम्‌ हेल्थ पोस्टच्या जागांचे अंतिम प्रस्ताव आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी (ता. ४) दिले.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आणि प्रस्तावित योजना आणि प्रकल्पांचा आढावा महापौर दयाशंकर तिवारी यांनी घेतला. यासाठी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, क्रीडा समितीचे सभापती प्रमोद चिखले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त (कर) मिलिंद मेश्राम, नगर रचना सहायक संचालक हर्षल गेडाम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, लसीकरण मोहिमेचे नोडल अधिकारी डॉ. टिकेश बिसेन, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिलू गंटावार, सहायक आयुक्त गणेश राठोड, प्रकाश वराडे, सुषमा मांडगे, किरण बगडे, हरिश राऊत, अशोक पाटील उपस्थित होते.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी वंदेमातरम्‌ हेल्थ पोस्ट या महत्त्वकांक्षी प्रकल्पासंदर्भात झोननिहाय आढावा घेतला. ज्या भागात आरोग्य सेवेची गरज आहे, अशा भागात हेल्थ पोस्ट उभारण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. यासाठी झोननिहाय जागा निवडण्यात आल्या असून त्या अंतिम करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करावी आणि पुढील आठ दिवसांत अंतिम प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

यासोबतच महापौरांनी आयुष हॉस्पीटल, जननी सुरक्षा योजना, रोगनिदान केंद्र, सिकलसेल रुग्णांसाठी डे केअर सेंटर, चालता-फिरता दवाखाना, गांधीनगर येथील रक्तपेढी, मदर मिल्क बँक आदी सर्व योजना आणि प्रकल्पांचा आढावा घेतला. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून मंजूर होणाऱ्या आयुष रुग्णालयासाठी जागा निवडीसंदर्भात अंतिम निर्णय यावेळी घेण्यात आला. यासंदर्भातही तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने गांधीनगर येथील रुग्णालयात रक्तपेढी संचालित करण्यात येते. ही रक्तपेढी लोकसेवेच्या भावनेतूनच संचालित करण्यात येत असल्याने त्याची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी, यासाठी त्याची योग्य पद्धतीने प्रसिद्धी करण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्या. रक्तपेढीमध्ये मुबलक रक्तसाठा राहण्यासाठी वर्षभरात रक्तदानाचे विविध उपक्रम राबविण्याची सूचनाही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली. नागपूर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी कुठलीही हयगय न करता दिलेल्या निर्देशांचे पालन करीत तातडीने सर्व प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावा, असेही ते म्हणाले.