नागपूर – बुधवार, दि. 9 जुलैला नागपुरात मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. नागपूरकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त करून स्पॉटनुसार अभ्यास करण्याचे तसेच आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
सदर येथील नियोजन भवन येथे ना. श्री. गडकरी व पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार चरणसिंग ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नासुप्रचे सभापती संजय मीणा यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो तसेच संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व मालवाहिन्यांची सफाई झाली होती, तर ही परिस्थिती का उद्भवली, असा सवाल ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना विचारला. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बेसा-बेलतरोडी, मनीष नगर भागात उद्भवलेल्या परिस्थितीवर ना. श्री. गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. बेसा-बेलतरोडी भागात अनधिकृत बांधकामामुळे देखील पावसाचे पाणी वस्त्यांमध्ये शिरल्याची बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली गेली. त्यावर अनधिकृत बांधकाम तोडून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही ना. श्री. गडकरी यांनी दिल्या. आमदार कृष्णा खोपडे यांनी पारडीमधील परिस्थिती बैठकीत सांगितली. तर आमदार प्रवीण दटके यांनी मेट्रो स्थानकांचेही पावसामुळे हाल झाले असल्याची बाब मांडली. त्यावर ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांनी प्रत्येक भागात प्रत्यक्ष जाऊन अभ्यास करण्याचे निर्देश दिलेत.
बुटीबोरी ते उमरेड हा रस्ता केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ)मधून मंजूर करण्याचे निर्देश ना. श्री. गडकरी यांनी दिले. तसेच कारंजा-लोहारीसावंगा-भारशिंगी-खरसोली–नरखेड-मध्यप्रदेश सीमेपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या डीपीआरला मंजुरी देण्याचे निर्देशही ना. श्री. गडकरी यांनी दिले.
कामठी येथे ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन उभारणे तसेच याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करणे या कामाचे निर्देश देऊन मेट्रोसाठी कामठी येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचाही प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
कोराडी येथे ‘रोप-वे’चा प्रस्ताव
श्री कोराडी महालक्ष्मी देवस्थानांतर्गत श्री महादेव टेकडी ते हनुमान मंदिर या ठिकाणी रोप-वेच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर ना. श्री. गडकरी यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.