| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jan 12th, 2019

  विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या कर्तव्याप्रती जागृत रहावे -आमदार गिरीष व्यास यांचे आवाहन

  नागपूर:विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या कर्तव्याप्रती जागृत राहून स्वच्छतेचा संदेश आपल्या जीवनात साकार करावा, असे आवाहन विधानपरिषदेचे आमदार गिरीष व्यास यांनी आज केले. स्‍वच्‍छतेबाबत जनजागृती करण्‍याच्‍या उद्देशाने आज पं. बच्‍छराज व्‍यास विद्यालय येथे आयोजित स्‍वच्‍छता जनजागृती महारॅलीचे उद्‌घाटन करतांना प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या महारॅलीस नागपूर शहरातील 100 शाळा सहभागी झाल्या होत्या. मुख्‍य रॅली

  पं. बच्‍छराज व्‍यास विद्यालय व कनिष्‍ठ महाविद्यालय, मेडिकल चौक येथे काढण्यात आली. याप्रसंगी शिक्षक मतदारसंघाचे विधानपरिषद आमदार ना. गो. गाणार, शिक्षण उपसंचालक सतिश मेंढे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) उमेश राठोड, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे सभापती उकेश चव्हाण, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शिरपूरकर, या प्रभागाच्या नगरसेविका लता काडगाय, शुभदा देशपांडे, प्रामुख्याने उपस्थित होते.

  भौतिक स्वच्छतेसोबतच मानसिक व वैचारिक स्वच्छताही महत्वाची आहे असे सांगून आमदार ना. गो. गाणार यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या संदेशाचा काटेकोरपणे अवलंब करण्याचे आवाहन यावेळी केले.

  केंद्र सरकारच्‍या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या अंतर्गत येणा-या फिल्‍ड आऊटरिच ब्‍यूरो नागपूर तसेच महाराष्‍ट्र राज्‍य शिक्षण विभागाच्‍या सहकार्याने ही स्‍वच्‍छता महारॅली नागपूर येथे आयोजित करण्यात आली. अशा प्रकारच्‍या महारॅलींचे महाराष्‍ट्रातील 29 महानगर पालिका क्षेत्रात एकाच वेळी आयोजन करण्‍यात आले होते. या महारॅलीमध्‍ये राज्‍यातील सुमारे 2900 शाळातील 5 लाख विदयार्थ्‍यी सहभागी झाले असून सुमारे 1 कोटी विद्यार्थ्यांनी स्‍वच्‍छतेची शपथ घेतली. या महारॅलीच्या अनुषंगाने नागपूर शहरातील निवडक 100 शाळांमध्‍ये स्‍वच्‍छतेचा संदेश देणा-या चित्रकला स्‍पर्धाचे आयोजन करण्‍यात आले होते. या चित्रकला स्‍पर्धेत मोठया संख्‍येने विदयार्थी सहभागी झाले होते, अशी माहिती फिल्‍ड आऊटरिच ब्‍यूरोचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी डॉ. मनोज सोनोने यांनी प्रास्ताविकातून दिली.

  यावेळी पं. बच्‍छराज व्‍यास विदयालयातील मुख्‍य कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी, विद्यार्थीनींनी स्वच्छता संदेश देणार फ़लक उंचावून व घोषणा देऊन परिसरात जनजागृती केली. यावेळी शाहीर मिराताई उमप व संच यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वच्छतेचा संदेश उपस्थितांना दिला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पं. बच्‍छराज व्‍यास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जोशी यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातल शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145