Published On : Wed, Nov 27th, 2019

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी संविधानाचाही अभ्यास करावा – श्रीकांत फडके

Advertisement

नागपूर: भारताचे संविधान हे जगात सगळ्यात मोठे लिखित संविधान आहे. आपले अस्तित्व, आपले सर्व अधिकार संविधानामुळे सुरक्षित आहेत. जगात भारतीय संविधान हे लिखित स्वरुपात आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला आपले जीवन जगण्याचे स्वातंत्र्य या संविधानामुळे मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना संविधानाचाही अभ्यास करावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालय व विभागीय माहिती केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने आज संविधान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थित कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व याबाबत माहिती दिली.

यावेळी सांख्यिकी कार्यालयाचे सहसंचालक कृष्णा फिरके, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ-दांदळे, जिल्हा माहिती अधिकारी (विशेष कार्य) अनिल गडेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

मोबाईल हे दुधारी तलवार आहे, मोबाईलचा वापर कसा करावा हे तुमच्यावर अवलंबून आहे. आयुष्यात प्रत्येक क्षण महत्त्वाचा असून त्या क्षणाचा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी यश मिळण्यासाठी उपयोग केला तर तुम्हाला नक्की यश मिळेल, असेही त्यांनी अनुभव कथन करताना सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान सर्व सामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी, समस्या याचा विचार करुन तसेच इतर देशातील संविधानाचा अभ्यास करुन तयार केले असल्याचे श्रीकांत फडके यावेळी म्हणाले.

विद्यार्थी कधीच अभ्यासापासून दूर जावू शकत नाही. प्रत्येकजण आपल्या संपूर्ण आयुष्यात विद्यार्थीच असतो. या स्पर्धेच्या युगात आपणाला आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी आपल्याला भारतीय संविधानाचा निश्चित उपयोग होईल आणि आपल्या आयुष्याची स्पर्धा आपणास सहज जिंकता येईल असे सांख्यिकी विभागाचे सहसंचालक कृष्णा ‍फिरके यांनी अधिकारी, व कर्मचारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांच्यासोबत सांख्यिकी विभागाचे सहसंचालक कृष्णा फिरके तसेच अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती नीलिमा भागवतकर यांनी तर आभार पूजा जांगडे यांनी मानले