नागपूर : नीट परीक्षा पेपर लीकप्रकरणाच्या निषेधार्थ नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन करत परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात संताप व्यक्त केला. देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.
आंदोलक विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेतील कथित निष्काळजीपणा, सुरक्षेतील त्रुटी आणि पारदर्शकतेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. नीट परीक्षेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.





