Published On : Tue, Oct 5th, 2021

गणित, विज्ञानची अत्याधुनिक प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक घेतील प्रशिक्षण

डॉ.विजय भटकर विज्ञान अनुसंधान केंद्रासंदर्भात महापौरांसमक्ष सादरीकरण : विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीवांना बळ देणारा प्रकल्प ठरणार पथदर्शी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने गरोबा मैदान येथील मनपाच्या बंद पडलेल्या शाळेच्या जागेमध्ये ‘पद्मभूषण डॉ.विजय भटकर विज्ञान अनुसंधान केंद्र’ साकारले जाणार आहे. या केंद्राची इमारत, रचना आणि त्यातील वैशिष्ट्य यासंदर्भात मंगळवारी (ता.५) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या समक्ष सादरीकरण करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या सादरीकरणादरम्यान शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त मिलींद मेश्राम, असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन चे ब्रम्हनंद स्वैन, श्याम रघुते व शारदूल वाघ, अश्विनी आर्किटेक्टच्या अश्विनी बोंदाडे आदी उपस्थित होते.

यावेळी आर्किटेक्ट अश्विनी बोंदाडे यांनी सादरीकरण केले. पद्मभूषण डॉ.विजय भटकर विज्ञान अनुसंधान केंद्रासाठी ६४५७.२४ वर्ग मीटर जागा निश्चित असून यापैकी ४३९९ वर्गमीटर जागेमध्ये हे केंद्र साकारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी २१ कोटी रुपये एवढा निधी प्रस्तावित आहे. पद्मभूषण डॉ.विजय भटकर विज्ञान अनुसंधान केंद्राची इमारत दोन माळ्यांची आहे. बेसमेंटमध्ये ४४ चारचाकी आणि १७२ दुचाकी वाहन पार्कींगची क्षमता असेल. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर कॉन्फरन्स हॉल, प्रदर्शन सभागृह आणि मोकळी जागा, प्रशिक्षण सभागृह, अत्याधुनिक वाचनालय आदींची व्यवस्था असेल. दुस-या माळ्यावर संशोधन आणि प्रशिक्षणासाठी येणा-या विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था असेल. डॉर्मिटरी, प्रशिक्षण केंद्र प्रदर्शन सभागृह आदींची व्यवस्था असेल. केंद्राच्या परिसरात ‘बॉटेनिकल गार्डन’ सुद्धा असेल.

पद्मभूषण डॉ.विजय भटकर विज्ञान अनुसंधान केंद्रामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि ‘सेंट्रल इंटिग्रेटेड लॅब’ अशा सात अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहेत. ८०० वर्गफुट जागेमध्ये प्रत्येक प्रयोगशाळा राहणार असून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीवा, संकल्पना स्पष्ट करून त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला बळ यामुळे मिळणार आहे. केंद्रामध्ये ४० आणि ८० लोकांच्या क्षमतेची दोन प्रशिक्षण सभागृह असतील. या सभागृहांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनाही विज्ञान आणि इतर विकासात्मक बाबींचे प्रशिक्षण घेता येउ शकेल. याशिवाय वैज्ञानिक दृक-श्राव्य स्मार्ट कक्षांची सुद्धा व्यवस्था केंद्रावर असणार आहे. ग्रीन बिल्डिंग तत्वावर उभारण्यात येणा-या या अनुसंधान केन्द्रामध्ये सौर उर्जा, रेन वाटर हार्वेस्टिंग ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

देशाला परम हे महासंगणक देणारे पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या नावाने नागपूर शहरात साकारले जाणारे हे विज्ञान अनुसंधान केंद्र नागपूर शहरातील मनपा व इतर सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीवा समृद्ध करून त्यांच्या कल्पनांना बळ देणारे केंद्र ठरणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे संचालन असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन या संस्थेद्वारे करण्यात येणार आहे. येणा-या काळामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि नागरिकांनाही वैज्ञानिक बाबींसंदर्भात संशोधन, प्रशिक्षणासाठी हे केंद्र महत्वाचे ठरणार असून देशात हे पथदर्शी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधन केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. मनपाच्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

पद्मभूषण डॉ.विजय भटकर विज्ञान अनुसंधान केंद्रासंदर्भात आवश्यक बाबींची पूर्तता करून तातडीने यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात यावी, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.