Published On : Tue, Oct 5th, 2021

नासुप्र’च्या ११९९व्या सर्व साधारण सभेत विविध प्रस्तावांना विश्वस्त मंडळाची मंजुरी

नागपूर: नागपूर सुधार प्रन्यास येथे सोमवार, दिनांक ०४ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या विश्वस्त मंडळाच्या ११९९व्या सर्व साधारण सभेत विविध कामांना मंजुरी देण्यात आली. नासुप्रचे सभापती मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नासुप्र विश्वस्त व पश्चिम नागपूरचे आमदार मा. श्री. विकास ठाकरे, नासुप्र विश्वस्त व स्थायी समिती सभापती मा. श्री. प्रकाश भोयर, नासुप्रचे विश्वस्त मा. श्री. संजय बंगाले, नासुप्रचे विश्वस्त मा. श्री. संदीप ईटकेलवार, नगर रचना विभागाचे सह संचालक श्रीमती सुप्रिया थुल, नासुप्रचे महाव्यवस्थापक मा. श्री. निशिकांत सुके, अधिक्षक अभियंता मा. श्रीमती लिना उपाध्ये आणि कार्यकारी अधिकारी मा. श्री. अनिल राठोड तसेच नासुप्र’चे इतर अधिकारी उपस्थित होते.

विश्वस्त मंडळाने मंजुर करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये प्रामुख्याने…

१) नासुप्रच्या ईडब्ल्यूएस अभिन्यासातील भूखंड धारकांना प्रथम पंजियन शुल्कामध्ये व तदनंतर नूतनीकरण शुल्कमध्ये सवलत देऊन मोठा दिलासा देण्यात आला आहे. तसेच त्याचेसाठी असलेल्या विविध शुल्कात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. तथापि मोठ्या भूखंड धारकांना देय असलेले शुल्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत तक्ता सोबत जोडलेला आहे.

२) गुंठेवारी अंतर्गत नियमितीकरण, ईमारत बांधकाम परवानगी, भूखंडाचे एकत्रिकरण, विलगीकरण इत्यादी करीता नागपूर महानगर पालिकेच्या खात्यात जमा केलेल्या शुल्काबाबत विश्वस्त मंडळीने ज्या प्लॉट धारकांनी नागपूर महानगर पालिका येथे नियमितीकरण शुल्क व इमारत बांधकाम शुल्क पटविले असल्यास त्याबाबत खात्री करून नासुप्रतर्फे नियमितीकरण शुल्क व इमारत बांधकाम परवानगी देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला.

३) मौजा हरपूर खसरा क्रमांक ९ ते १२ व १६/२ येथील ९.५० एकर नासुप्रच्या मालकीच्या जागेवर नागपूर सुधार प्रन्यास व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सयूंक्त उपक्रमाद्वारे अर्धवट स्थितीत निर्माणाधिन क्रिडा संकुल प्रकल्प नागपूर सुधार प्रन्यास व क्रिडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्याकरीता शासनाच्या मान्यतेस पाठविण्यात यावा.

४) न्यू-कॉटन मार्केट लेआऊट मधील ३ एकर जागेवर फुल मार्केटकरिता देण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व नासुप्र यांनी संयुक्त उपक्रम राबवावे यावर विश्वस्त मंडळाने मान्यता दिली.

५) नासुप्र मालकीच्या खसरा क्रमांक ३६ , मौजा गोन्हीसिम, नागपूर ग्रामीण येथील मोकळी जागा महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महा-ज्योती करिता आजच्या बाजार भावाप्रमाणे देण्यासाठी शासनासनाकडे पाठविण्याकरिता मंजुरी प्रदान करण्यात आली.

६) नागपूर सुधार प्रन्यासमध्ये सरळ भरतिची रिक्त पदांची भरती करण्यासंबंधाने निर्णय घेण्यात आला.