
नागपूर : रंगांच्या जल्लोषात कायद्याची कडक नजर असणार आहे. होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर २ ते ३ मार्चदरम्यान शहरात वाहतूक पोलिसांचा विशेष बंदोबस्त सज्ज करण्यात आला आहे. तब्बल १०० ठिकाणी नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात व्यापक मोहीम राबविण्यात येणार असून रोडवरील स्टंटबाजी आणि हुडदंगावर थेट कारवाई केली जाणार आहे.
“सण साजरा करा, पण नियम पाळूनच,” असा स्पष्ट इशारा लोहित मतानी (उपायुक्त, वाहतूक) यांनी दिला आहे. आज आणि उद्या रात्री शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील भाग तसेच महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यांवर विशेष पथके तैनात राहणार आहेत.
वाहनचालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली जाईल. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबनाचीही प्रक्रिया राबविली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट, चारचाकीचालकांनी सीटबेल्टचा वापर अनिवार्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
होळीच्या निमित्ताने काही ठिकाणी तरुणांकडून रोडवर स्टँडबाजी, मोठ्या आवाजात डीजे, वेगमर्यादा ओलांडणे किंवा धोकादायक स्टंट करण्याचे प्रकार घडतात. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी यंदा अधिक कडक भूमिका घेतली आहे.
नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून सुरक्षित आणि शांततेत सण साजरा करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.








