Published On : Mon, Sep 28th, 2020

भंडारा जिल्हयात 2 ते 4 ऑक्टोबर कडक जनता कर्फ्यु

Advertisement

• सर्व पक्षीय बैठकीत निर्णय

• दर शनिवार- रविवारला जनता कर्फ्यु

• कोरोना साखळी तोडण्यासाठी निर्णय

भंडारा – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संक्रमण साखळी तोडणे आवश्यक असून यासाठी शुक्रवार, शनिवार व रविवारी (2, 3 व 4 ऑक्टोबर 2020 रोजी) जिल्हाभरात कडक जनता कर्फ्यु लागू करण्यावर सर्व पक्षीय बैठकीत एकमत झाले. पहिला तीन दिवस व त्यानंतर पुढील सुचनेपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी जिल्हाभर कडक जनता कर्फ्यु लावण्यावर या बैठकीत सहमती झाली.

खासदार सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत असून नागरिक काळजी घेतांना दिसत नाहीत. त्याचप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन सुद्धा केल्या जात नाही. यावर बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. लोकांच्या मनात कोरोना आजाराविषयी भीती असल्यामुळे उशिरा तपासणीसाठी येतात ही बाब गंभीर असून लक्षणं आढळताच तपासणी करण्याबाबत नागरिकात जागृती करावी असे सर्वांचे मत होते.

जनता कर्फ्युबाबत या बैठकीत सर्वांची मते जाणून घेण्यात आली. जनता कर्फ्यु हा कडक व जिल्हाभर लागू करण्यात यावा असे मत सर्वांनी मांडले. या काळात केवळ वैद्यकीय सेवा सुविधा वगळता सर्व दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात यावेत, अशी सूचना सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी केली. यात प्रामुख्याने पेट्रोल पंप, दारू दुकानं, ढाबा आदींचा बंद मध्ये समावेश असावा असा सूर बैठकीत उमटला. मात्र आरोग्य सेवा सुविधा कुठेही थांबणार नाही व बाधित होणार याची काटेकोर काळजी घेण्यावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

भाजीपाला दुकानांची व्यवस्था विकेंद्रित करावी असेही बैठकीत ठरले. खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचाराबाबत शासकीय दराचे फलक रुग्णालयात दर्शनी भागावर लावावे व असे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रुग्णालयाना द्यावे असेही बैठकीत ठरले. तुमसर येथे कोविड रुग्णालय उभारले असून लवकरच साकोली व पवनी येथे उभारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली व जनता कर्फ्युला पाठींबा दिला. तसेच वैद्यकीय सेवेत काही सुधारणा सुचविल्या.

खासदार सुनील मेंढे
ही लढाई सर्वांची असून आपण सर्व एकत्रितपणे लढू या असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनता कर्फ्यु आवश्यक असून प्रथम तीन दिवस व नंतर प्रत्येक शनिवारी व रविवारी जिल्हाभर बंद जनता कर्फ्यु लागू राहील. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. हा बंद कडकडीत असणार असून नागरिकांनी समाज स्वास्थ्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन खासदारांनी केले.

आमदार नरेंद्र भोंडेकर
जनता कर्फ्युचा हा सर्व पक्षीय सामूहिक निर्णय असून आता अशा परिस्थितीत या शिवाय दुसरा पर्याय नाही. जनता कर्फ्यु काळात लोकांनी वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत आपल्याकडे येणाऱ्या स्वयंसेवकांना खरी माहिती पुरवावी असे आवाहन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले. हा बंद नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी असल्याने यात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी संदीप कदम
सध्यातरी मास्क, सुरक्षित अंतर व वारंवार साबणाने हात स्वच्छ करणे हेच कोरोनावर औषध आहे. कुठलाही आजार अंगावर न काढता लक्षण आढळताच तात्काळ तपासणी करा व कोरोना पासून आपले संरक्षण करा असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

रेमडेसिव्हीर उपलब्ध
जिल्ह्यात रेमडेसिव्हीर उपलब्ध असून आणखी तीन हजार इंजेक्शनची मागणी नोंदविली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन शासनाकडून प्राप्त होत आहेत. गंभीर रुग्णालाच रेमडेसिव्हीर देण्यात येते. कृपया अन्य रुग्णांनी या इंजेक्शनची मागणी करू नये असे आवाहन जिल्हाधकाऱ्यांनी केले.