Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Mar 9th, 2021

  गृह विलगीकरणाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर बुधवारपासून सक्त कारवाई करा

  मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे निर्देश

  नागपूर, : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन करावे याबाबत सोमवारी (ता.८) मनपाद्वारे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशानुसार गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पाच हजार रुपये दंड तसेच पोलिस कारवाई केली जाणार आहे. मनपाच्या या आदेशाची सर्व झोनमध्ये सक्तीने अंमलबजावणी व्हावी, यादृष्टीने कार्यवाही केली जावी. आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरूद्ध सक्तीने कारवाई करा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.

  कोव्हिड संदर्भात मनपाद्वारे सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासंदर्भात मंगळवारी (ता.९) मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील ‘कोरोना वार रूम’मध्ये झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त सर्वश्री जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, राजेश भगत, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, प्रकाश वराडे, हरीश राउत, अशोक पाटील, विजय हुमने, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील यांच्यासह सर्व झोनच वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

  लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना गृह विलकीकरणामध्ये राहण्याची मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी नियम निर्धारित करण्यात आले आहेत. अनेक कोरोनाबाधितांकडून गृह विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे सक्तीने गृह विलगीकरणाच्या नियमांचे पालन व्हावे याबाबत मनपा झोन स्तरावर भरारी पथक (फ्लाईंग स्कॉड) गठीत करण्यात आले असून वैद्यकीय कारणाशिवाय गृह विलगीकरणातील कोरोनाबाधित घराबाहेर दिसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय ५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशाची बुधवार (१० मार्च)पासून काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

  गृह विलगीकरणातील बाधितांच्या सोयीसाठी त्यांच्या मोबाईलवर मनपाद्वारे ‘एसएमएस’ पाठविले जाणार आहे. त्यामध्ये त्यांना पाळावयाचे नियम, घ्यावयाची काळजी व उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच निकषाचे पालन न करणा-यावर कारवाईबददल सूचनाही दिली जाईल.

  समुपदेशन सुरू करा
  कोरोना पॉझिटिव्ह येणा-या नागरिकांच्या परिसरातील लोक तसेच गृह विलगीकरणातील बाधित रुग्ण यांच्या मनात अनेक शंका असतात. त्यांच्या शंकांचे निरसरन करून त्यांचे समुपदेशन करण्याचे कार्य सुरूवातीच्या काळात शहरामध्ये आयएमए च्या डॉक्टरांद्वारे करण्यात आले. आज शहरात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा नागरिक आणि रुग्णांचे समुपदेशन करण्यासाठी आयएमए ने पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. विशेष म्हणजे, काही डॉक्टरांनी स्वयंपुढाकाराने रुग्णांचे समुपदेशन सुरू केल्याबद्दल आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी त्यांचे अभिनंदनही केले. बाधित व्यक्ती किंवा परिसरातील नागरिकांच्या समुपदेशनासंदर्भात आयुक्तांच्या आवाहनाला आयएमए द्वारे सहकार्य दर्शविण्यात आले आहे.

  प्रतिबंधित क्षेत्र निश्तिच करा
  कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची गरज आहे. त्यादृष्टीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. ज्या भागामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत. तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात यावे. याशिवाय त्या परिसरात मनपाद्वारे आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात यावी. मनपाच्या या कार्यवाही ला कुणाही नागरिक अथवा संस्थेद्वारे विरोध होत असल्यास संबंधितांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

  नवीन हॉटस्पॉटमधील चाचणी वाढवा
  बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात ‘इमर्जिंग हॉटस्पॉट’ वाढत आहेत, अशी ठिकाणे त्वरीत लक्षात घेउन त्या ठिकाणच्या जास्तीत जास्त नागरिकांची कोरोना चाचणी केली जाईल, याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय गृह विलगीकरणातील कोरोना बाधितांना मनपाद्वारे घरपोच आवश्यक औषधांचा पुरवठा होत आहे अथवा नाही याची सुद्धा पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

  पालक अधिका-यांची नेमणूक
  कोरोना संबंधी तसेच इतर बाबीसंदर्भात झोनस्तरावर राबविल्या जाणा-या विविध योजना व कामांची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी यासाठी मनपा आयुक्तांद्वारे पाच ‘पालक अधिकारी’ नेमणूक करण्यात आले आहेत. झोनस्तरावरीत कोव्हिड विषयक विविध कामे, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, वसुली, बांधकाम विषयक कामे, स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विषयक कामे, महत्वाचे प्राधान्याचे विषय आदी सर्व कामांच्या अंमलबजावणीची जबाबदारी पालक अधिका-यांकडे राहिल. एका पालक अधिका-याकडे दोन झोनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

  मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनकरिता अतिरिक्त आयुक्त (सेवा) संजय निपाणे, हनुमाननगर व धंतोली झोनकरिता अतिरिक्त आयुक्त (सामान्य) जलज शर्मा, नेहरूनगर व गांधी महाल झोनकरिता अतिरिक्त आयुक्त (शहर) राम जोशी, सतरंजीपुरा व लकडगंज झोनकरिता उपायुक्त (वृक्ष व प्राधिकरण) रवींद्र भेलावे, आसीनगर व मंगळवारी झोनकरिता उपायुक्त (समाज विकास विभाग) राजेश भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  सर्व झोनचे सहायक आयुक्त व अन्य अधिका-यांनी आपापल्या झोनमधील विविध महत्वाचे विषय किंवा कामांबाबत संबंधित पालक अधिका-यांच्या वेळोवेळी संपर्कात राहून त्यांना त्या संदर्भात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145