मुंबई : राज्यातील अंतर्गत सुरक्षेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेत ‘महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक’ बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे सशस्त्र माओवाद्यांसह संविधानविरोधी माओवादी चळवळीवर कडक कारवाईचा मार्ग मोकळा झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे स्वागत करत कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सशस्त्र माओवाद्यांविरोधात आळा घालण्यासाठी आम्ही जन सुरक्षा कायदा पारित केला आहे. यामुळे आता अर्बन माओवादी चळवळींवर प्रभावीपणे कारवाई करता येणार आहे. जंगल व ग्रामीण भागांतील सशस्त्र माओवादी घटकांची संख्या कमी होत आहे. त्यांचं पूर्ण उच्चाटन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “अशा काही संघटना आहेत ज्या ‘अर्बन फ्रंट’च्या नावाखाली घटनात्मक कामकाजाचा देखावा करतात. याआधी चार राज्यांत असे कायदे होते, ज्यामुळे संबंधित राज्ये अशा चळवळींविरुद्ध कारवाई करू शकत होती. आता महाराष्ट्रातही हा कायदा लागू झाल्याने आम्ही अशा अर्बन नक्षलवादी संघटनांवर कठोर कारवाई करू.”
राज्यातील सुरक्षा व्यवस्थेसाठी हे विधेयक निर्णायक ठरेल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत असून, अतिरेकी आणि संविधानविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी हे विधेयक प्रभावी ठरेल, असे मत विधानसभेतील चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आले.