नागपूर : शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. हुडकेश्वर परिसरातील आम्रपाली नगर येथे रविवारी भीषण घटना घडली. भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका लहान मुलावर अचानक हल्ला करून त्याला १२ ते १५ ठिकाणी चावा घेतला. शिवम बाहैकर असे या बालकाचे नाव असून, तो गंभीर जखमी अवस्थेत लहूलुहान झाला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी संताप व्यक्त करत, भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, शहरात वाढत्या कुत्रा चावल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर, सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन (SSO) ने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. स्मिता मिरे यांच्या नेतृत्वाखालील ही संस्था ‘मिशन रेबीज’ या उपक्रमाअंतर्गत १ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान मोफत रेबीज लसीकरण मोहीम राबवणार आहे.
या मोहिमेतून नागपूरमधील भटक्या कुत्र्यांना रेबीज लस देऊन प्राणीसंवर्धनासह नागरिकांच्या सुरक्षेलाही चालना मिळणार आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांकडून नागरिकांच्या विनंतीनुसार सोसायट्या आणि परिसरांमध्ये जाऊन लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे, कुत्र्यांना तणाव नको म्हणून शक्य तिथे जाळ्यांचा वापर न करता लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्मिता मिरे यांनी आवाहन केले, प्रत्येक लसीकरण केलेला कुत्रा म्हणजे नागरिकांसाठी कमी रेबीजचा धोका आणि प्राण्यांसाठी अधिक चांगली काळजी. नागपूरकरांनी या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा.