नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिक भयभीत झाले आहेत. रस्त्यावर फिरणारे हे कुत्रे अचानक पादचाऱ्यांवर धावून जात असल्याने लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अर्जुन नगर आणि प्रगती नगर परिसरात तर या कुत्र्यांचे थवे मुक्तपणे फिरताना दिसतात. गेल्या वर्षी अशाच हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नगरपंचायतीने अल्पकाळ मोहिम राबवली होती; मात्र आज पुन्हा भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.
पालक मुलांना बाहेर खेळायला घाबरतात, तर शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या कुत्र्यांच्या धाकामुळे त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही ठोस कारवाई होत नसल्याने रोष व्यक्त होत आहे.
निवासींचं म्हणणं आहे की, नगरपंचायतीने तातडीने पावलं उचलून या कुत्र्यांवर नियंत्रण आणलं नाही, तर कधीही एखादी गंभीर दुर्घटना घडू शकते. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे.