Published On : Fri, Aug 14th, 2020

नागपूर स्मार्ट सिटी चे शहराचे विद्रुपीकरण रोखण्याच्या दिशेने पाऊल

Advertisement

नागपुर – नागपूर शहरात स्मार्ट सिटी मिशनचे सेफ ॲन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत काही कोटी खर्च करून ऑप्टीकल केबलचे जाळे टाकण्यात आले आहे. आता हे केबलचे नेटवर्क शहरातील केबल एजन्सीना व इंटरनेट सेवा देणा-या कंपनीला ‍लिजवर दिल्या जाईल. भूमिगत केबल नेटवर्कचा उपयोग केल्याने ओव्हरहेड केबलचे जाळे हळूहळू कमी होऊन शहराचे विद्रूपीकरण दूर झाल्याने नागपूर शहर सुंदर दिसेल.

नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश मोरोणे यांच्या पुढाकाराने केबल ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा देणा-या कंपनी सोबत बैठक शुक्रवारी (१४ ऑगस्ट) ला आयोजित करण्यात आली. या बैठकीत महेश मोरोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी),महाव्यवस्थापक (ई-गव्हर्नन्स) शील घुले आणि नागपूरातील प्रमुख केबल ऑपरेटरर्स उपस्थित होते.

श्री. मोरोणे यांनी सांगितले की,शहरातील केबल ऑपरेटरर्स केबल टाकताना पथ दिव्यांचे पोल, टेलिफोन चे पोल, झाडावरून व घरावरून केबल नेतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. तसेच वादळ व पाऊस यामुळे कधीही केबल तुटून धोका होण्याचा संभव असतो. स्मार्ट सिटीचे प्रकल्पातंर्गत शहरात सर्वत्र भुमिगत केबल आच्छादण्यात आले आहेत. या अतंर्गत एकंदर 700 जंक्शन बॉक्सेस आहेत. ज्या जंक्शन बॉक्समधून केबल ऑपरेटर लोकांच्या घरापर्यंत भुमिगत केबल टाकून उत्तम प्रकारची सेवा नागरिकांना देवू शकतील.

NSSCDCL चे फायबर नेटवर्क वापरण्यासाठी केबल ऑपरेटरला निर्धारीत शुल्क अदा करावे लागेल. याबाबतचा विस्तृत प्रस्ताव NSSCDCL चे आगामी संचालक मंडळाचे बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचे माहिती श्री मोरेाणे यांनी दिली. श्री. मोरोणे म्हणाले की, नागपूर मनपाचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी ही संकल्पना मांडली होती आणि त्यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेणारी नागपूर ही देशातील प्रथम स्मार्ट सिटी ठरेल.

अर्नेस्ट ॲन्ड यंग चे श्री. विशाल नंदे यांनी नागपूर स्मार्ट सिटीच्या ऑप्टीकल फायबर नेटवर्क बद्दलची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, केबल नेटवर्कचे वर्गीकरण झोन स्तरावर, वॉर्ड स्तरावर करण्यात आले आहे.

श्री. मोरोणे यांनी लीज शुल्क निर्धारित करण्यासाठी श्री. शील घुले यांच्या नेतृत्वात एक कमेटी गठित केली आहे. ही कमेटी पुढच्या आठवडयात निर्णय घेईल.