‘आशां’चे मानधन वाढविण्यात यावे! महापौर संदीप जोशी यांची सूचना
नागपूर: कोव्हिड-१९ विषाणूच्या काळात प्रारंभापासून इमानेइतबारे आपली सेवा देणाऱ्या आशा वर्कर्सचे मानधन १५ ऑगस्टपासून वाढविण्यात यावे, अशी सूचना महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्तांना केली आहे.
यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांना पत्र पाठविले आहे. पत्रात नमूद केल्यानुसार, नागपूर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोनाविरुद्धचा लढा समर्थपणे लढत आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आशा वर्कर्स या अगदी प्रारंभापासून आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. नागपूर शहरातील अनेक वस्त्यांत, तळागळात जाऊन कोरोना विषाणूसंदर्भात सेवाकार्य करीत आहेत. मात्र त्यांना मानधन स्वरूपात केवळ एक हजार रुपये देण्यात येतात.
सद्यस्थिती पाहता आशा वर्कर्स आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्या मोबदल्यात त्यांना मिळणारे मानधन अगदीच तुटपुंजे आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून नागपूर महानगरपालिकेने त्यांच्या मानधन वाढीचा विचार करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे येत्या १५ ऑगस्टपासून डिसेंबर महिन्यापर्यंत त्यांना वाढीव एक हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी पत्रातून केली आहे.