Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Feb 25th, 2021

  शनिवार, रविवार घरीच राहा, उत्स्फूर्तपणे प्रतिष्ठाने बंद ठेवा, कोरोनाला हददपार करा

  महापौर, आयुक्तांचे नागरिकांना आवाहन : सर्व कार्यालयेही बंद राहणार

  नागपूर: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहे. हे निर्बंध कडक असले तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवा. घरीच राहा. आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

  नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावरून महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांना उद्देशून नियम पाळण्याचे आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने प्रशासनाने घातलेले निर्बंध पाळून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, एक कोरोनाबाधीत व्यक्ती गर्दीत गेला तर २५ व्यक्तींना त्याचा संसर्ग होऊ शकतो. अर्थात आपल्यामुळे इतरांचे आरोग्य धोक्यात टाकणे योग्य नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग हे नियम पाळावेच आणि वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. अति आवश्यक सेवा सुरु राहतील. मनपा प्रशासनाला घरी राहून सहकार्य करा. नागरिक व प्रशासन मिळून कोरोनाला हदद़पार करु शकतो, असेही महापौर म्हणाले.

  मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असावी यासाठी मनपा प्रशासन कठोर पावले उचलत आहे. मनपाची उपद्रव शोध पथकाची चमू दिवसरात्र नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. मात्र, कारवाई हा त्यावरील उपाय नसून नियम पाळणे आणि संसर्ग टाळणे अत्यावश्यक आहे. यासाठी काही नियम कडक केले आहे. शनिवार आणि रविवारी कुणीही घराबाहेर निघू नये, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही दुकाने, मॉल, बाजार, थिएटर, नाट्यगृह, उपहारगृह, हॉटेल, रेस्टॉरेंट, सरकारी, निमशासकीय, खासगी कार्यालये, मनपाचे कत्तलखाने, शहरातील मांस विक्रीची दुकाने सुरू राहणार नाही. नागरिकांनीही अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. कुटुंबासोबत दिवस घालवावा आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145