Published On : Thu, Feb 25th, 2021

शहर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योगदान देऊ शकल्याचा आनंद

Advertisement

मावळते जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी व्यक्त केली भावना

नागपूर : नागपूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करून नागरिकांना सुविधा निर्माण करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न तीन वर्षाच्या कार्यकाळात करण्यात आला. या कार्याही काही यश तर काही अपयश वाट्याला आले. मात्र आपल्या शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी शहर पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या कार्यात आपणही योगदान देउ शकल्याचा विशेष आनंद आहे, अशी भावना मावळते जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी व्यक्त केली.

जलप्रदाय समिती सभापती म्हणून विजय झलके यांचा सलग तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेमध्ये नगरसेवक संदीप गवई उपस्थित होते.

यावेळी २०१८ ला जलप्रदाय समिती सभापती म्हणून पदभार स्वीकारणारे विजय (पिंटू) झलके यांनी सलग तीन वर्ष जलप्रदाय समिती सभापती म्हणून भूषविलेल्या कार्यकाळाचा लेखाजोखा पुढे ठेवला. शहरात सर्व भागात पाणी पुरवठा सुरळीतरित्या व्हावे याकरिता टाक्यांची संख्या वाढविणे अत्यावश्यक आहे. ही बाब हेरून शहरात पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढविण्याकडे भर दिला. अनेक भागांमध्ये टाकीच्या निर्मितीसाठी जागा उपलब्ध नाही व काही भागात नागरिकांकडूनही विरोध होत असल्याचे निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून ‘डबल डेकर’ पाण्याची टाकी तयार करण्याची संकल्पना पुढे आली. ‘व्हिजनरी लिडर’ नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात ‘डबल डेकर’ मेट्रोचे उड्डाण पूल तयार झाले. त्याच धर्तीवर एकाच ठिकाणी दोन पाण्याच्या टाक्या निर्मितीची संकल्पना पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न केला. नागपुरातील प्रभाग ३४ मधील चक्रपाणी नगर भागात ही ‘डबल डेकर’ टाकी तयार होणार आहे. यासंदर्भात सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

तीन वर्षाच्या या कार्यकाळामध्ये तत्कालीन महापौर नंदा जिचकार, आयुक्त अभिजित बांगर पुढे महापौर संदीप जोशी, आयुक्त तुकाराम मुंढे व विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह जलप्रदाय अधीक्षक श्वेता बॅनर्जी व कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. नागपूरकर जनतेच्या आशीर्वादाने आपल्या शहरासाठी होणा-या महत्वाच्या कार्यात आपण सहभागी झाल्याबद्दल कृतज्ञ असल्याची भावना विजय (पिंटू) झलके यांनी व्यक्त केली.

तीन वर्षातील विजय झलके यांचे प्रमुख कार्य

– २४x७ योजनेद्वारे १० कमांड एरिया वाढवून २३ केले

– पाणी पुरवठा ६६५ एमएलडी वरून ६५७ एलएलडी

– उपभोक्तांची संख्या ३ लाख ३६ हजार ६८६ वरून ३ लाख ७५ हजार ७५८ वर (३९ हाजार ७२ उपभोक्त्यांची वाढ)

– पाईपलाईन, ५९७.२६ किमी वरून ६८७.५० किमी

– गृह नळजोडणी, १ लाख ६८ हजार ९५३ वरून २ लाख ४६ हजार ७०६ एवढी वाढ

– डिजिटल पेमेंट सुरू करण्याची महत्वपूर्ण सुरूवात, आज २९ टक्के पाणी बिल डिजिटल पेमेंटद्वारे भरले जाते

– अवैध नळजोडणी कापण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये एक पथक गठीत

– प्रत्येक झोनमध्ये थकबाकी संग्रहकांचे पथक गठीत

– पाणी होत नसलेल्या २७० क्षेत्रात पाणी पुरवठा, लाभार्थी- २ लाख २३ हजार २९६

– एकदिवसाआड पाणी पुरवठा होत असलेल्या १३२ क्षेत्रात दररोज पाणी पुरवठा, लाभार्थी – २ लाख १३ हजार ४०८

– अत्यल्प दाबाने पाणी पुरवठा असलेल्या ४२८ क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा दाब वाढविण्यात यश, लाभार्थी – ७ लाख ७१ हजार ७५९

– २५ कॉमन एरिया मध्ये २४x७ योजना लागू, लाभार्थी – ६ लाख ७ हजार ९४

– दुषित पाणी पुरवठ्याची १२८ क्षेत्राची समस्या सोडविली, लाभार्थी – १ लाख १६ हजार ६७९

– एकूण लाभार्थी १९ लाख ३२ हजार २३६

हुडकेश्वर-नसराळा क्षेत्रातील कार्यान्वित झालेल्या नवीन टाक्या

– चंद्रभागानगर (२.२७ एमएलडी)

– भारतमातानगर (२.२७ एमएलडी)

– संभाजीनगर (२.२७ एमएलडी)

– १५० किमी पाईप लाईनचे जाळे

– ११ हजार घरांना नळ जोडणी

– ७६ पैकी ७४ टँकर्स कमी केले

– मंगळवारी झोन अंतर्गत गोरेवाडा येथे नवीन टाकी निर्मिती (३ एमएलडी)

– लकडगंज झोन अंतर्गत बाभुळबन येथे नवीन टाकी निर्मिती (२.२७ एमएलडी)

– दोन्ही टाक्यांचे येणा-या काळात लोकार्पण

– २८ उद्यानांमध्ये ‘रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टीम’ लागू

– ‘वाटर ऑडिट’ची सुरूवात व पूर्णत्वास नेले

– खैरी येथून होणा-या पाणी पुरवठा ठिकाणचे ५ लिकेजेस दुरूस्त, ७ एमएलडी पाणी बचत

– शहरातील ५०२ विहीरींची स्वच्छता

– पाणी टंचाईच्या परिस्थितीत २८९ विहीरींमधून पाणी पुरवठा

– ४०९ बोअरवेलची निर्मिती

– अमृत योजनेंतर्गत ३७७ किमी पाईप लाईन पैकी २६० किमी पूर्ण

– ११ पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम सुरू

– १७० लेआउटला पाणी पुरवठा सुरू

– या संपूर्ण कार्यामुळे नळजोडणी नसलेल्या भागातील ३४६ टँकर्सपैकी १२० टँकर्स कमी करण्यात आले