मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला मर्यादित न ठेवता, संपूर्ण महाराष्ट्रभर ते उभे करण्याची तयारी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे.
मुंबईपुरते मर्यादित न राहणारे आंदोलन-
सूत्रांच्या माहितीनुसार, जरांगे यांनी आपली रणनीती बदलत आंदोलन सात टप्प्यांत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गावपातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत मराठा समाजाचा सहभाग असणार आहे. त्यामुळे 29 ऑगस्टपासून फक्त मुंबईतच नव्हे, तर राज्यातील प्रत्येक भागात आंदोलन पेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रणनीतीतील बदल-
आतापर्यंत शांततेच्या मार्गाने सरकारकडे मागणी करणारे जरांगे आता अधिक आक्रमक भूमिका घेणार आहेत. एकाच वेळी राज्यभर आंदोलन छेडून सरकारवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे.
आंदोलनाचे स्वरूप काय असणार?
या सात टप्प्यांचे नेमके स्वरूप अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यात रास्ता रोको, जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे, तहसील कार्यालयांसमोर निदर्शने यांसारख्या आंदोलनांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारसमोर मोठे आव्हान-
या नव्या घडामोडींमुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. जर मराठा समाजाने राज्यव्यापी पातळीवर आंदोलन उभे केले, तर कायदा-सुव्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे. सरकार आता समाजाला शांत करण्यासाठी कोणते पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.