Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Feb 27th, 2021

  एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल येथे अत्याधुनिक आयसीयु, ऑपरेशन थिएटर व इतर सुविधांचे उद्घाटन संपन्न

  एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर येथे डॉ. गोपाल दुबे (ज्येष्ठ फिजिशियन व एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता) यांच्या हस्ते नुकतेच नवीन अत्याधुनिक आयसीयु, ऑपरेशन थिएटर व इतर सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.

  ६० बिछान्यांचे अत्याधुनिक नवीन अतिदक्षता विभाग उद्घाटित करण्यात आले (मेडिसिन, सर्जरी व स्त्री/प्रसुती विभागाच्या गंभीर आजारी रूग्णांसाठी). मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरयुक्त नवीन सर्जिकल ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे उद्घाटनही करण्यात आले. यात सेन्ट्रल एयर कंडीशन व सेन्ट्रल ऑक्सिजनची सुविधा आहे. सोबतच नवीन ओपीडी / नोंदणी काउंटरचे उद्घाटनही करण्यात आले. या कॉम्प्लेक्समध्ये रुग्णांसाठी प्रचंड मोठे प्रतीक्षालय असून जुन्या, नवीन आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजना, सीजीएचएस, बीपीएल इत्यादी विविध शासकीय योजनांशी संबंधित रूग्णांसाठी स्वतंत्र काउंटर आहेत.

  लता मंगेशकर हॉस्पीटलने रुग्णांसाठी बरीच नवीन उपकरणे घेतली आहेत, त्यापैकी स्वयंचलित पेरीमेट्री (नेत्र रोग विभाग), गॅस्ट्रोडूओडेनोस्कोप (सर्जरी विभाग) आणि फायबर ऑप्टिक ब्रॉन्कोस्कोप (छातीरोग विभाग) यांचे उद्घाटन करून रूग्णसेवेसाठी समर्पित करण्यात आले.

  या उद्घाटन समारंभात व्हीएसपीएम अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. आशिष देशमुख म्हणाले, “आम्ही या वर्षी संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजीतबाबू देशमुख यांचा ७५ वा वाढदिवस व अमृत महोत्सव वर्ष साजरे करीत आहे. अत्याधुनिक सुविधांचे त्यांचे स्वप्न असल्यामुळे ही नवीन सुविधा यांना समर्पित करीत आहे. १९९० साली एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटलची स्थापना करण्यात आली. मागील ३० वर्षात संस्थेने मोठी भरभराट केली आहे. आता रुग्णालयात सर्व अद्ययावत उपकरणांसह १२० आयसीयु बिछाने आहेत. १३०० बिछाने असलेल्या रुग्णालयात एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आमचे उद्दीष्ट आहे,‘अल्प दरात उत्कृष्ट आरोग्य सेवा’. डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची चमू रुग्णांना दर्जेदार सेवा देतात. यावर्षी देखील रुग्णालय गरजू रूग्णांच्या हितासाठी विविध योजना राबवित आहे. डेंटल आणि फिजिओथेरपी कॉलेजसुद्धा अत्याधुनिक उपचार सेवा प्रदान करतात.”

  प्रमुख अतिथी डॉ. गोपाल दुबे यांनी रुग्ण व समाजाच्या हितासाठी या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल व्हीएसपीएमएएचईच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या वेळच्या आपल्या आठवणी त्यांनी बोलून दाखविल्या. अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा यांनी नवीन अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर व इतर सुविधांच्या उपलब्धतेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व सहाय्यक कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. कमी खर्चात रुग्णांना उत्कृष्ट उपचार सेवा प्रदान करण्यात येतील, असे आश्वासन यांनी यावेळी दिले. संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजितबाबू देशमुख यांनी आपल्या सर्व कर्मचार्‍यांचे आभार मानले आणि संस्थेच्या प्रगतीबद्दल मनापासून समाधान व्यक्त केले.

  डॉ. भाऊसाहेब भोगे, श्री. शैलेष चालखोर, श्री. सुधीर देशमुख, डॉ. विलास धानोरकर (संचालक-रुग्णालय प्रशासन), डॉ. मुर्तझा अख्तर (वैद्यकीय अधीक्षक), एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटलच्या विविध विभागांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पीजी सेलचे संचालक डॉ. नितीन देवस्थळे यांनी आभार मानले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145