नागपूर : महावितरण अंतर्गत आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला गुरुवारी (दि. २७) सकाळी ९ वाजता स्वारगेट येथील कै. बाबूराव सणस क्रीडांगणावर सुरवात होत आहे. तीन दिवसीय या स्पर्धेमध्ये महावितरणमधील सुमारे ७६८ खेळाडू सहभागी होत आहेत.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन, संचालक (संचालन व प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, कार्यकारी संचालक (प्रकल्प व मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे उपस्थित राहणार आहेत.
महावितरण अंतर्गत १६ परिमंडलाचे एकूण ८ संघ तसेच ५९२ पुरुष व १७६ महिला खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत आहेत. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धीबळ, कॅरम, कुस्ती, धावणे, लांब उडी, उंच उडी, गोला फेक, थाळी फेक, भाला फेक, ब्रीज, टेनिक्वाईट या खेळांचे पुरुष व महिला गटात सामने होणार आहेत. स्वारगेटमधील सणस क्रिडांगण व नेहरू स्टेडीयम, हिराबाग येथील डेक्कन क्लब, एसपी कॉलेजजवळील स्काऊट ग्राऊंड या ठिकाणी हे सामने होतील. या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेच्या आयोजनाचा मान यंदा पुणे परिमंडलाला मिळाला असून या स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून मुख्य अभियंता सचिन तालेवार काम पाहत आहेत. शनिवारी, दि. २९ डिसेंबरला दुपारी ४ वाजता सणस क्रीडांगण येथे या स्पर्धेचा समारोप होणार आहे
