Published On : Fri, Nov 10th, 2017

शहराच्या पायाभूत विकासासाठी राज्य शासनाची मोठी गुंतवणूक – मुख्यमंत्री


नागपूर: देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी केवळ महानगराला सुविधा न पुरविता अन्य शहरांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असून अशा शहरातील पायाभूत विकासासाठी राज्य शासनाने मोठी गुंतवणूक केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. क्रेडाईच्यावतीने आयोजित न्यू इंडिया समीट कार्यक्रमात ते बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाईचे चेअरमन गेतांबर आनंद, उपाध्यक्ष आनंद सिंघानिया, अध्यक्ष सतीश मगर, महाराष्ट्र क्रेडाई अध्यक्ष शांतीलाल कटारिया उपस्थित होते.

घरबांधणी प्रकल्पाशी निगडीत बाबी ऑनलाईन पद्धतीनेच दिल्या जाव्यात यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच ई-प्लॅटफार्म कार्यान्वित करेल, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील महानगराबाहेर आठ लाख घरे उभारण्याचा राज्य शासनाचा कार्यक्रम आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्र सध्या देशात अग्रेसर असला तरी ही आघाडी टिकविणे महत्वाचे असून यासाठी क्रेडाईने पुढे यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. घनकचऱ्याचे व्यवस्थापन विक्रेंद्रीत पद्धतीने होणे आवश्यक आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापनाचे विक्रेंद्रीकरण न झाल्यास शहरातील स्वच्छता टिकणार नाही. भारतात व्यवसाय करणे सोपे झाले असून या संदर्भातील आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये भारताची मोठी प्रगती झाली आहे. याचे सर्व श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांना असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सामान्य माणसांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असून गरिबांना परवडणारी घरे उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेत. या योजनेत क्रेडाईने पुढे आल्यास शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधांचा या प्रकल्पात समावेश असणार आहे. या परिषदेमध्ये झालेली चर्चा व ठराव या संदर्भात क्रेडाईने शासनाला सादर केल्यास या चर्चा क्षेत्रातील निर्णयावर शासन सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियानाशी बांधिलकी दर्शवत दोनशेहून अधिक क्रेडाई सदस्यांनी क्रेडाई क्लिन सिटी मुव्हमेंट लिमीटेडशी सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत दोन लाखांहून अधिक घरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुढील दोन वर्षाच्या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाअंतर्गत एक दशलक्षाहून घरापर्यंत पोहचण्याचा मानस आहे. क्रेडाई स्वच्छ शहर अभियान ही वस्तीपातळीवरील विक्रेंद्रीत घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा असून ही कचऱ्याच्या प्रक्रियेवर आधारित आहे. यासाठी बायोडायजेस्टर डबे किंवा बायोडायजेस्टर पोस्ट वापरण्यात येत असून शहरातील घनकचऱ्याचे नैसर्गिक खतामध्ये रुपांतरीत करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम देशभर पोहचविण्यासाठी दोनशेहून अधिक क्रेडाई सदस्यांनी विकासकाशी संवाद साधला असून पर्यावरण संरक्षणात योगदान देण्यासाठी क्रेडाई या परिषदेत आवाहन केले आहे.


क्रेडाई आपल्या क्लीन सिटी मूव्हमेंटच्या माध्यमातून सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात योगदान देत आहे. 200 हून अधिक सदस्यांनी आमच्याशी या संदर्भात करार केल्यामुळे आणि घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा स्वीकारत असल्याने आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत. नजीकच्या भविष्यात अधिकाधिक सदस्यांना या उपक्रमात सहभागी करुन घेऊ आणि हा उपक्रम अधिक उंची गाठेल, अशी आशा क्रेडाईचे अध्यक्ष जक्षय शहा यांनी व्यक्त केली.

आमच्या क्लीन सिटी मूव्हमेंटमध्ये 200 हून विकासक सहभागी झाल्याची घोषणा करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. या उपक्रमासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि दर्शविलेली बांधिलकी याबद्दल आम्ही त्यांची प्रशंसा करतो. येत्या दोन वर्षात हा उपक्रम किमान 30 शहरांमध्ये आम्ही राबवू शकू, अशी आम्हाला आशा आहे. भविष्यकाळात हा उपक्रम देशातील कानाकोपऱ्यामध्ये पोहचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे क्रेडाईचे चेअरमन गेतांबर आनंद यांनी सांगितले.

क्रेडाईतर्फे आयोजित न्यू इंडिया समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासकांनी विविध सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्याचप्रमाणे क्रेडाई नागपूर यांनी तयार केलेल्या कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अभ्यासू, कष्टाळू व शिस्तप्रिय असून महाकर्जमाफी, समृद्धी महामार्ग व जलयुक्त शिवार या योजनांमुळे संपूर्ण देश त्यांना ओळखत असल्याचे शांतीलाल कटारीया यांनी सांगितले. राज्याच्या विकासासाठी असलेल्या महत्वाच्या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आपल्या कार्यालयात वॉर रुम तयार करणारे देशातील ते एकमेव मुख्यमंत्री असल्याचे कटारीया म्हणाले.

क्रेडाईच्यावतीने आयोजित या परिषदेला बांधकाम व उद्योग क्षेत्रातील नामांकित बांधकाम व्यवसायी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.