Published On : Mon, Jul 29th, 2019

मुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन ५० टक्के निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Advertisement

ठाणे : प्रस्तावित कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला उपलब्ध करून दिला जाईल, यामुळे मुरबाडकरांचे स्वप्न पूर्ण होईल. 26 व 27 जुलै रोजी झालेल्या बदलापूर-कल्याण परिसरातील पूरपरिस्थितीमुळे घरात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून राज्य शासन नुकसानग्रस्तांना भरीव मदत करेल आणि गरज भासल्यास नव्या निकषानुसार शासन निर्णय काढण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आज ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, पोलीस स्टेशन मुरबाड आणि पोलीस अधिकारी/कर्मचारी वसाहत उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कार्यक्रमास पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार सर्वश्री नरेंद्र पवार, किसन कथोरे, निरंजन डावखरे, माजी आ. गोटीराम पवार, दिगंबर विशे, नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष पवार, कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते झाले हा माझ्या दृष्टीने भाग्याचा दिवस आहे. आज विविध कामांची सुरुवात या भागात होत आहे. शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी राज्य केले. महाराजांनी सामान्य माणसाला जागृत करून त्यांच्यात ऊर्जा निर्माण केली. गेली 5 वर्षे आम्ही शिवछत्रपतींचे आशीर्वाद घेऊन काम करीत आहोत. त्यामुळे कितीही संकटे आली तरीही मार्ग काढला आणि विकास केला.

परवाच्या पुरामुळे या भागात मोठे नुकसान झाले आहे. 2005 मध्ये प्रति घरटी 5 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जात होती. यात भरीव मदत करण्याचा शासन निश्चित विचार करेल असे त्यांनी सांगितले. पुरामुळे जे रस्ते खराब झाले आहेत, त्याच्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नागपूर समृद्धी महामार्ग 24 जिल्ह्यांसाठी विकासावर परिणाम करणारा आहे. हा महामार्ग गेमचेंजर म्हणून ओळख देईल. बदलापूर येथील पुरग्रस्तांसाठी भरीव मदत करावी अशी त्यांनी मागणी केली.

आ.किसन कथोरे यांनी या भागातील माळशेज घाटाला चीनच्या धर्तीवर काचेचा स्कायवॉकसाठी मंजूरी मिळावी, अशी मागणी केली. या भागातल्या रस्त्यांसाठी शासनाने जी भरीव मदत केली, त्याबद्दल त्यांनी आभार मानले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एस.टी.स्टॅण्डचे भूमिपुजन, धान्याच्या गोदामाचेही भूमिपुजन आणि म्हसा येथील महाविद्यालयाचेही ई-भूमिपुजन करण्यात आले.

या कार्यक्रमास पाऊस असूनही पंचक्रोशीतील जनतेने मोठी गर्दी केली होती.

Advertisement
Advertisement