Published On : Sun, Mar 4th, 2018

सन २०१७-१८ चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान

मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सहभाग असलेल्या महिला महोत्सवाचे ८ ते ११ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, मराठी चित्रपट, कीर्तन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन व कलादान या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींना सन २०१७-१८ चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार आज प्रदान करण्यात आले, त्यावेळी श्री. तावडे बोलत होते. या कार्यक्रमास आमदार सदा सरवणकर आदी उपस्थित होते.

सांस्कृतिक कला आणि लोककला प्रकार ही आपली महाराष्ट्रीयन संस्कृती असून या संस्कृतीचे जतन करणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. सर्व कला प्रकारांच्या माध्यमातून आपण आपल्या पिढीसमोर आपला इतिहास पोहोचवणार आहोत, असे सांगून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर राज्यात लवकरच ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’ सुरू करणार असल्याची घोषणाही यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि बाबुजी उपाख्य सुधीर फडके यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे, असेही श्री. तावडे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्राला विविध कलेच्या माध्यमातून समृद्ध संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. सांस्कृतिक कला क्षेत्रातील नृत्य, नाट्य, सिनेमा, उपशास्त्रीय गायन, कंठसंगीत, कीर्तन- समाजप्रबोधन, शाहिरी इत्यादी कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ कलेची आणि संस्कृतीची सेवा केलेल्या मान्यवर कलावंताचे यावेळी श्री. तावडे यांनी अभिनंदन केले.

सन २०१७-१८ या वर्षीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार आज ज्यांना प्रदान करण्यात आले ते पुढीलप्रमाणे- श्रीमती सेवा चव्हाण (नाटक), पं. शांताराम चित्ररी गुरुजी (कंठसंगीत), कल्याणी देशमुख (उपशास्त्रीय संगीत), वाल्मिक धांदे (वादयसंगीत), सरोज सुखटणकर (मराठी चित्रपट), नरहर अपामार्जने (कीर्तन), श्रीमती झरीना बेगम युसूफ सय्यद (तमाशा), शाहीर शिवाजीराव पाटील (शाहिरी), दिपक मुजूमदार (नृत्य), भिकाजी तांबे (लोककला), ओल्या रुपा पाडवी (आदिवासी गिरीजन) आणि माऊली टाकळकर (कलादान) यांचा समावेश आहे. तर केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त विजेते मोहन जोशी (अभिनय), पं. प्रभाकर कारेकर (कंठ संगीत), पद्मा तळवळकर (कंठ संगीत) आदींचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी ‘कलादर्पण’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.