Published On : Mon, Dec 20th, 2021

विधिमंडळात एसटी कर्मचारी आंदोलकांचे प्रश्न मांडणार : आ. बावनकुळे

Advertisement

नागपूर: राज्य विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात एसटी कर्मचारी आंदोलकांचे प्रश्न आपण विधान परिषदेत मांडणार असून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

आ. बावनकुळे यांनी आज काटोलच्या एसटी बसस्थानकाला भेट देऊन आंदोलकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी भाजपनेते चरणसिंग ठाकूर व अन्य उपस्थित होते. आंदोलकांच्या समस्याही आ. बावनकुळे यांनी ऐकून घेतल्या. दीर्घ काळापासून सुरु असलेल्या एस. टी. कर्मचार्‍यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यावर महाविकास आघाडीने अजूनही तोडगा काढला नाही. उलट आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांना निलंबित आणि बडतर्फ केले जात आहे. अशी सरकारची काम करण्याची पध्दत आहे, याकडेही आ. बावनकुळे यांनी लक्ष वेधले.


केवळ एस.टी. कर्मचार्‍यांचा प्रश्न नसून या शासनाने सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या कोणताही प्रश्न सोडवला नाही. एकही विकास महाराष्ट्रात कुठेच सुरु नाही. काम न करणारे व कर्मचारी आणि गरिबांवर जुलूम करणारे हे सरकार आहे. सर्व शासकीय योजना ठप्प आहे. अपूर्ण असलेल्या विकास कामांचा निधीही या शासनाने रोखून ठेवला आहे. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले सरकार आहे, अशी टीकाही आ. बावनकुळे यांनी केली.

या कार्यक्रमात एस.टी. कर्मचारी संपाच्या दरम्यान आत्महत्या करणार्‍या कर्मचार्‍यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कर्मचार्‍यांचे सर्वच प्रश्न मी विधान परिषदेत धसास लावील असेही आ. बावनकुळे म्हणाले. या कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.