मुंबई: जिथं कोणतंही वाहन पोहोचत नाही तिथं तोट्यात असतानाही पोहोचणारी एसटी, नेहमीच प्रवाशांसाठी अधिकाधिक सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असते. गेल्या दिवाळीमध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 30 रुपयांमध्ये चहा-नाश्ता ही योजना सुरू केली होती. या योजनेत एसटी हायवेवरच्या ज्या हॉटेलवर थांबणार त्या हॉटेलला 30 रुपयांमध्ये चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले होते. या योजनेला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
राज्यभरात प्रवासादरम्यान एसटीच्या बसेस चहापाण्यासाठी बस थांब्यावर थांबतात. या थांब्यावर संबंधित हॉटेलमालकाकडून लूट व्हायची. ही लूट थांबवण्यासाठी महामंडळाने खास प्रवासी योजना जाहीर केली. एसटी बस थांब्यावर जेवण, चहा, नाश्ता यासाठी प्रवाशांकडून हॉटेलचालक मनमानी पद्धतीने पैसे वसूल करत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाने काही अटींची पूर्तता करून राज्यभरात अधिकृत बस थांब्यांना परवाना दिला आहे. त्या बसथांब्यावर ३0 रुपयांमध्ये चहा-नाश्ता प्रवाशांना मिळतो.
मुंबई-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील फूड प्लाझा आणि सेंटर पॉइंट या दोन्ही हॉटेलमध्येदेखील ३0 रुपयांमध्ये एसटीच्या प्रवाशांना चहा-नाष्टा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मार्गावर लोणावळा या ठिकाणीही हजारो पर्यटक येतात. राज्याच्या अनेक भागातून येणार्या बसदेखील या हॉटेलमध्ये थांबतात. त्यामुळे एसटीने येणार्या प्रवाशांना या हॉटेलमध्ये कमी खर्चात चांगले खाद्यपदार्थ मिळत असल्यामुळे प्रवाशांसाठी देखील ते चांगले असल्याचे मत आपल्या पत्रात लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी व्यक्त केले आहे. तसे पत्र त्यांनी एसटी महामंडळाला लिहिले आहे.