Published On : Sat, Apr 8th, 2017

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ

Advertisement


मुंबई:
एसटी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि सुखद बातमी… एसटी महामंडळाच्या कनिष्ठ वेतनश्रेणीतबन १२ हजार ५१४ कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. शिवाय कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी देखील ३ वर्षांहून एक वर्ष करण्यात आलं आहे. एसटी महामंडळाच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. विधान परिषदेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. १ एप्रिल २०१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी, ही कर्मचाऱ्यांची मागणी होती. मात्र ती रद्द न करता तिचा कालावधी एक वर्ष एवढा करण्यात आला आहे.

कनिष्ठ वेतनश्रेणीत सहा महिने पूर्ण झाल्यानंतर वेतनात ५०० रुपयांनी वाढ करण्यात येईल. एक वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येईल, असं दिवाकर रावते यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी २००० साली लागू करण्यात आली. सेवेत रुजू झाल्यानंतर ५ वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम करण्याची त्यावेळी तरतूद करण्यात आली होती. तब्बल पाच वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ होतो.

एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा कनिष्ठ वेतनश्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सेवेत रुजू होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतरही तुटपुंज्या वेतनात काम करावं लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाने दिलासा मिळणार आहे.