Published On : Fri, Aug 28th, 2020

श्रीगणेश विसर्जन : कृत्रिम तलाव व्यवस्थेची महापौरांनी केली पाहणी

Advertisement

नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा करण्यात येत असलेल्या यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेश मूर्तीचे विसर्जन घरीच करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. विसर्जनासाठी तलावावर बंदी आहे. मात्र आवश्यकतेनुसार कृत्रिम तलावांची व्यवस्था नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आली असून या व्यवस्थेची पाहणी महापौर संदीप जोशी यांनी केली.

शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर तलावाच्या ठिकाणी भेट देत अधिकाऱ्यांकडून व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत आणि धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे यावेळी उपस्थित होते.

महापौर संदीप जोशी यांनी सर्वप्रथम फुटाळा येथील व्यवस्थेची पाहणी केली. कोरोनाचे संक्रमण असल्याने विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये, यास प्राथमिकता देण्यात आली आहे. त्यामुळे मनपातर्फे महापौर आणि प्रशासनाने घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरीच करण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षी कृत्रिम तलावांची जी व्यवस्था करण्यात येते ती इतर वर्षींच्या तुलनेत यावेळी केवळ ५० टक्के करण्यात येणार आहे. आवश्यकता असली तरच या कृत्रिम टँकचा वापर करावा आणि केवळ दोन व्यक्तींनी गणेश विसर्जनासाठी यावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी या दौऱ्याच्या निमित्ताने केले.

फुटाळा येथे ग्रीन व्हिजील फाऊंडेशन आणि अन्य स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी गर्दी होऊ नये, सोशल डिस्टंसिंग पाळल्या जावे यासाठी व्यवस्थेत आहे. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी आणि टीम लीडर सुरभी जैस्वाल यांनी यावेळी महापौर संदीप जोशी यांना दररोज विसर्जनासाठी येणाऱ्या मूर्तींची संख्या आणि नागरिकांची संख्या याविषयी माहिती दिली.

यानंतर महापौरांनी सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर येथेही भेट देऊन व्यवस्थेसंदर्भात आवश्यक ते निर्देश दिले. सार्वजनिक गणेश मंडळांनीही तलावावर विसर्जनाकरिता न येता संबंधित परिसरातच मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. नागपूर महानगरपालिकेने यंदाही ‘विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पना अंमलात आणली असून दहाही झोनमध्ये ‘विसर्जन रथा’ची व्यवस्था केली आहे. त्याचे संपर्क क्रमांक मनपाच्या अधिकृत सोशल मीडियावर देण्यात आले असून या व्यवस्थेचाही लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.