Published On : Fri, Nov 2nd, 2018

खेलो इंडिया स्पर्धा नियोजनाबाबतचे वेळापत्रक तयार करण्याच्या क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या सूचना

Advertisement

मुंबई: केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स 2019 पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे जानेवारी महिन्यात 8 ते 20 जानेवारी दरम्यान होणार आहे. खेलो इंडिया स्पर्धा 18 विविध खेळांमध्ये होणार असून यासंदर्भातील नियोजनाबाबतचे वेळापत्रक तयार करावे, अशा सूचना क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज दिल्या.

खेला इंडिया युथ गेम्स 2019 आयोजनासंदर्भातील उच्चस्तरीय समितीची बैठक आज क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. तावडे यावेळी म्हणाले, राज्यातील क्रीडा विकासाला गती देण्यासाठी क्रेंद शासनाने सुरु केलेल्या खेला इंडिया राष्ट्रीय योजनेची अंमलबजावणी करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे खेळासाठी राज्यात पायाभूत सुविधा निर्मिती, उत्कृष्ट खेळाडू, उच्च दर्जाचे प्रशिक्षक तयार होण्यास मदत होणार आहे.

खेलो इंडिया योजनेच्या अंमलबजावणीसाठी क्रीडा व युवक सेवा आयुक्तांच्या स्तरावर नोडल एजन्सी स्थापन करण्यात येणार आहे. तसेच खेलो इंडिया युथ गेम्स आयोजनासाठी समिती गठित करण्यात आली असून या समितीने उच्चस्तरीय व आयोजन समितीशी समन्वय करुन स्पर्धांचे आयोजन करावयाचे आहे. विविध 18 खेळांमध्ये स्पर्धा आयोजित करीत असताना अधिकाधिक खेळाडू यामध्ये समाविष्ट करणे, तसेच सर्व खेळाडू, मार्गदर्शक, तांत्रिक अधिकारी अशा सर्वांची सुरक्षा आणि निवास, भोजन व्यवस्था करणे आवश्यक असेल असे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.