Published On : Fri, Jun 12th, 2020

केंद्र व राज्य शासनाच्या दिशानिर्देशाच्या अधिन राहून क्रीडा संकुल सुरू करावे

Advertisement

क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले : समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय

नागपूर : लॉकडाउनमुळे सुमारे तीन महिन्यांपासून शहरातील सर्व क्रीडा संकुल, मैदाने बंद आहे. सद्या लॉकडाउनमध्ये शिथिलता असून त्याचा फायदा क्रीडापटूंना व्हावा, यासाठी शहरातील अनेक क्रीडा संघटनांमार्फत समितीला निवेदन देण्यात आले. मनपाच्या क्रीडा संकुलमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करून खेळता येतील, तर या खेळांना नियमांचे अधीन राहून परवानगी देऊ शकतो का, याची चाचपणी करावी. महापालिकेच्या अनेक क्रीडा संकुलांमध्ये बॅडमिंटन कोर्ट आहेत. या खेळात सोशल डिस्टंसिंगचेही पालन होते. मात्र केंद्र व राज्य शासनामार्फत कोव्हिड संदर्भात जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांच्या अधिन राहूनच मनपाची क्रीडा संकुले सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी दिले.

विविध विषयाच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता.१२) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात क्रीडा विशेष समितीची बैठक घेण्यात आली. संपूर्ण सोशल डिस्टंन्सिग नियमाच्या अधिन राहून झालेल्या बैठकीत समिती सभापती प्रमोद चिखले, समितीच्या उपसभापती तथा उपमहापौर मनीषा कोठे, सदस्य सुनील हिरणवार, सदस्या नेहा वाघमारे, कांता रारोकर, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, सहायक शिक्षणाधिकारी नितीन भोळे, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, नरेश सवाईथुल आदी उपस्थित होते.

यावेळी कोरोना संक्रमणामुळे बंद असलेल्या मनपाच्या क्रीडा संकुलात सॅनिटायझर फवारणी करून क्रीडा संकुल पुन्हा सुरू करणे या विषयासह कोरोना संक्रमणामुळे नवीन क्रीडा नियमावली तयार करून काही क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, २१ जून २०२० रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या दिवशी घरातच राहून मनपाचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना योग करता यावे यासाठी आवश्यक कार्यवाहीसंदर्भात विस्तृत चर्चा करण्याचेही यावेळी समिती सभापतींनी निर्देशित केले.