Published On : Mon, Sep 11th, 2017

विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा संकूल सज्ज

नागपूर: विभागीय क्रिडा स्पर्धेसाठी मानकापूर येथील क्रीडा संकूल सज्ज झाले आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या विदर्भातील पहिल्या अद्ययावत सिंथेटिक ट्रकची पाहणी महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी (ता.१) ला केली. यावेळी त्यांच्यासमवेत क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, महाराष्ट्र शासनाचे क्रीडा विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर, नागपूर ॲथलॅटिक्स असोसिएशनच्या सदस्या अर्चना किट्टेवार प्रामुख्याने उपस्थित होते.

विभागीय ॲथलॅटिक्स स्पर्धा १६,१७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी हा ट्रॅक तयार झालेला असून विदर्भातील पहिला सिंथेटिक अद्ययावत ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. हा ट्रॅक उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असून लवकरात लवकर याचे उद्घाटन करण्यात यावे, अशी विनंती रेवतकर यांनी महापौर नंदा जिचकार यांना केली. त्यावर महापौरांनी मुख्यमंत्र्यांशी बोलुन तारीख ठरवू, असे आश्वासन दिले. या ठिकाणी पॅव्हेलियनही तयार करण्यात येणार आहे. त्या बांधकामाचीदेखील पाहणी महापौरांनी केली.

असा आहे नवा ॲथलेटिक्स ट्रॅक

मानकापूर येथे नव्याने तयार करण्यात आलेला ॲथलेटिक्स ट्रॅक हा संपूर्ण सिंथेटिक असून पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमच्या धरतीवर बनविण्यात आला आहे. येथे नव्या अद्ययावत विद्युत सुविधा असणार असून फ्लड लाईटची व्यवस्था असणार आहे. त्यामध्ये जमिनीत आत पाण्याचे स्प्रिंकल लावण्यात आले असून जेणेकरून पाणी ट्रॅकवर साचणार नाही याची देखील काळजी घेण्यात आली आहे.