Published On : Sat, Feb 27th, 2021

नागपुरातील ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

व्यापारी, नागरिकांचे महापौरांनी मानले आभार : बाजारात फिरून केली जनजागृती

नागपूर : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले होते. या आदेशाचे पालन करीत नागपुरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. नागरिकांनीही घरीच राहणे पसंत केले. याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागरिकांचे आभार मानले.

शनिवार आणि रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापौर दयाशंकर तिवारी यांनी इतवारी आणि गोकुळपेठ बाजारांचा दौरा केला. इतवारी बाजार दौऱ्याच्या वेळी गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक संजय महाजन, मनोज चापले उपस्थित होते. गोकुळपेठ बाजारातील दौऱ्यात धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेवक संजय बंगाले उपस्थित होते. या दोन्ही दौऱ्यात अनेक भाजी, फळविक्रेते मास्क परिधान केलेले नव्हते. त्यांना महापौरांनी मास्क परिधान करण्याचे आवाहन केले. यानंतर पुन्हा मास्कविना आढळले तर दंड ठोठावण्याचे निर्देश सोबत असलेल्या उपद्रव शोध पथकाला त्यांनी दिले. जे मास्कविना आढळतात अशा विक्रेत्यांना प्रथम समज द्या, जनजागृती करा, त्यानंतरही ते ऐकत नसेल तर दंड आकारा, असे निर्देश त्यांनी दिले.

व्यापारी, नागरिकांचे आभार
शनिवार आणि रविवारी बाजारात प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याचा संभव असतो. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा प्रशासनाने दोन दिवस बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची नागपुरातील बहुतांश सर्वच व्यापारी, नागरिकांनी अंमलबजावणी केली. त्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्व व्यापारी, नागरिकांचे आभार मानले.

जिल्हा प्रशासनाने समन्वय ठेवावा
महापौर दयाशंकर तिवारी यांना कुठलेतरी वाईन शॉप सुरू असल्याचा दूरध्वनी आला. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता दारूच्या घरपोच सेवेला परवानगी असल्याचे सांगितले. जर मनपा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर दारूची दुकानेही बंद असावीत कारण ती अत्यावश्यक सेवेत येत नाहीत. यासाठी जिल्हाधिकारी यांनी मनपा प्रशासनाशी समन्वय ठेवून निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.