Published On : Fri, Mar 31st, 2023

‘स्वच्छता मशाल मार्च’ मध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नागपूरसाठी जनजागृती

- दिल्लीच्या कार्यक्रमात मनपाचे कौतूक
Advertisement

नागपूर: स्वच्छोत्सव-२०२३ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे काढण्यात आलेल्या ‘स्वच्छ यात्रा’ व ‘स्वच्छ मशाल मार्च’ला शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. शुक्रवारी (ता.३१) सकाळी संविधान चौकातून निघालेल्या या मशाल मार्चमध्ये मनपाच्या स्वच्छता कर्मचारी महिलांसह शहरातील विविध बचत गटांच्या महिलांनी सहभाग नोंदविला.

अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, समाज विकास विभागाचे उपायुक्त प्रकाश वराडे, तेजस्विनी महिला मंचाच्या किरण मुंधडा, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुधे, शुभांगी पडोळे यांचा सहभाग होता.

मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूरच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या ‘स्वच्छता मशाल मार्च’ला संविधान चौकातून सुरूवात झाली. ही रॅली पुढे विधानभवन चौक, मिठा नीम दर्गा रोड, अन्नपुरवठा विभाग कार्यालय, गुप्ता हाऊस मार्गे पुढे इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, फ्रीडम पार्क येथून पुन्हा संविधान चौकात आली व येथे सांगता झाली. मनपाच्या महिला स्वच्छता कर्मचारी, अनेक बचत गटाच्या महिला, स्वछता समाजसेवी संस्था व स्वछताप्रेमीं अशा ५०० च्या वर महिलांचा सहभाग या रॅलीत होता.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या ‘स्वच्छोत्सव’ उपक्रमांतर्गत दिल्ली येथे बुधवारी (ता.२९) केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री श्री. हरदीप सिंग पुरी व सहसचिव रूपा मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्वच्छोत्सव’ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी उपस्थितीत दर्शवून नागपूर शहराच्या स्वच्छतेबाबतच्या नवकल्पना आणि शहरात राबविण्यात येत असलेल्या नवोपक्रमांची माहिती दिली.

‘स्वच्छोत्सव’ ही सर्वत्र स्वच्छतेविषयी जागृती करण्यासाठी महिलांनी राबविलेली एक मोहिम आहे. कचरामुक्त शहर बनविण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील महिलांच्या परिश्रमाचा त्यांचा कार्याचा उत्सव साजरा करण्यासाठी शहरांमध्ये कार्यक्रम आणि उपक्रमांची मालिका आयोजित केली होती. हा एक प्रकारचा आंतरराज्य पीअर लर्निंग उपक्रम होता. या अंतर्गत एरिया लेव्हल फेडरेशन्स (ALF) किंवा सेल्फ हेल्प ग्रुप्स (SHG) च्या सदस्यांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून निवडक शहरांमध्ये प्रवास करण्यास प्रोत्साहित केले गेले. तसेच यात्रेदरम्यान महिला बचत गटांना (SHGs) स्वच्छतेच्या प्रतिज्ञाद्वारे ‘कचरामुक्त शहरे’ या संकल्पनेसाठी त्यांची वचनबद्धता व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले गेले.

महाराष्ट्रातील विविध बचत गट आणि महिला स्वच्छता कर्मचा-यांच्या निवडक प्रतिनिधींचा समावेश असलेला एक गट ‘स्वच्छोत्सवात’ सहभागी झाला. महाराष्ट्राच्या गटाचे नेतृत्व मनपाच्या समाज विकास विभाग दीनदयाळ नागरी उपजीविका अभियानाच्या शहर व्यवस्थापक नूतन मोरे यांनी केले. महिलांचा हा गट महाराष्ट्रातील भूसावळ शहरात दाखल झाला. यानंतर देशातील सर्वात सुंदर शहरात इंदूर येथे चार दिवस मुक्काम करून येथील स्वच्छता कार्ये व स्वच्छता कार्यात महिलांची भूमिका याची माहिती जाणून घेतली. स्वच्छतेसंदर्भात महिलांद्वारे सुरू असलेल्या कार्याची दखल घेत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाद्वारे या गटाला दिल्ली येथील कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिला गटाच्या कार्याचे कौतुक केले.