Published On : Fri, Mar 31st, 2023

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा

अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावा
Advertisement

नागपूर : कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात यावी. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून जास्तीत जास्त नागरिकांची कोव्हिड चाचणी करा, असे निर्देश मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिले.

कोरोनाचा वाढता संभाव्य धोका लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. शुभम मनगटे, डॉ.सागर नायडू यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. कोरोनाचा पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज करून सौम्य किंवा जास्त लक्षणे आढळणा-या रुग्णांची त्वरीत चाचणी करण्यात यावी. पॉझिटिव्ह रुग्णांचे जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचणीवर भर देण्याचे श्री. राम जोशी यांनी निर्देशित केले.

शहरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमधील संशयीत व पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती, त्यांची स्थिती याबाबत माहिती सतत अपडेट करण्यात यावी. याशिवाय खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये होणा-या चाचण्यांकडे सुद्धा लक्ष देण्याचे त्यांनी निर्देश दिले. मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था कार्यान्वित करणे, कोव्हिड प्रतिबंधासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व साहित्य सज्ज ठेवण्याचेही अतिरिक्त आयुक्तांनी निर्देश दिले. नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा मुख्यालयातील नियंत्रण कक्ष सुद्धा कार्यान्वित करण्यात आले आहे. याशिवाय शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये १० व ११ एप्रिल रोजी मॉकड्रील घेण्याबाबतही श्री. राम जोशी यांनी निर्देशित केले.

सुरक्षेसाठी ही काळजी घ्या

(१) गर्दीच्या आणि बंदिस्थ ठिकाणी विशेषतः सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती आणि वृध्द यांनी जाणे टाळावे.

(२) डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी आरोग्य सुविधांमध्ये/रुग्णालयात मास्क घालावे.

(३) गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणे.

(४) शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/टिश्यू वापरणे.

(५) हाताची स्वच्छता राखणे/वारंवार हात धुणे

(६) सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे

(७) श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करणे

अँटीजेन व आरटीपीसीआर कोरोना चाचणी केंद्र