Published On : Thu, Nov 30th, 2017

फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची पेंच राष्ट्रीय उद्यानात ‘जंगल सफारी’

श्रीलंकेविरुद्ध नागपुरात दुसऱ्या कसोटीत चौथ्याच दिवशी विजय नोंदविल्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने फावल्या वेळेचा सदुपयोग केला. विजयात मोलाची भूमिका वठविणाऱ्या अश्विनने मित्रांसोबत पेंच राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी केली.

नागपूर: श्रीलंकेविरुद्ध नागपुरात दुसऱ्या कसोटीत चौथ्याच दिवशी विजय नोंदविल्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने फावल्या वेळेचा सदुपयोग केला. विजयात मोलाची भूमिका वठविणाऱ्या अश्विनने मित्रांसोबत पेंच राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी केली.
तामिळनाडूचा मित्र विजय शंकर व अन्य दोन मित्रांसोबत अश्विन मध्य प्रदेशच्या सिवनी जवळच्या पेंच राष्ट्रीय उद्यानात आला होता.
त्याने जंगल भ्रमंतीचा आनंद लुटल्याची माहिती पेंचचे सहायक वनसंरक्षक आशिष बन्सोड यांनी दिली. अश्विनने मंगळवारी सकाळी पेंचमध्ये जंगल सफारी केली. भ्रमंतीदरम्यान खेळाडूंना अलिकट्टा येथे व्याघ्र दर्शन झाले. खासगीत जंगल भ्रमंतीवर आलेल्या क्रिकेटपटूंना पाहून अन्य पर्यटकांनी देखील त्यांच्यासोबत छायाचित्रे काढून घेतली. जंगल भ्रमंतीनंतर अश्विन आणि सहकाऱ्यांनी येथील नैसर्गिक सौंदर्याचे तोंडभरून कौतुक केले.
‘मी वन्यजीवप्रेमी असून, जंगल आणि वन्यजीव यांच्याप्रति संवेदनशील असल्याचे अश्विनने भ्रमंतीनंतर नमूद केल्याची माहिती बन्सोड यांनी दिली. वेळ मिळताच अश्विन जंगल सफारीवर नेहमीच जातो, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.
मंगळवारी सायंकाळी अश्विन नागपुरात परतताच टीम इंडियातील सहकाऱ्यांसोबत दिल्लीकडे रवाना झाला. तिसरी कसोटी २ डिसेंबरपासून फिरोजशाह कोटलावर सुरू होत आहे.