Published On : Sat, Jan 29th, 2022

जिल्हा विकास समन्वय तथा सनियंत्रण समितीची बैठक

Advertisement

नागपूर: झोपडपट्टी पुनर्वसनावर भर देवून प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकूल गरीब गरजू नागरिकांना दया. त्याचबरोबर पाणी पुरवठा व स्वच्छतेवर अधिक लक्ष देवून योजनेचा निधी कालमर्यादेत खर्च करा, अशा सूचना खासदार डॉ. विकास महात्मे यांनी संबंधित यंत्रणेस दिल्या.

जिल्हा समन्वय विकास तथा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात खा. महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. आमदार कृष्णा खोपडे, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, समितीचे सदस्य श्री. बोरीकर व श्री. उके प्रामुख्याने उपस्थित होते.

नरेगा अंतर्गत कामांना गती देवून फळबाग व इतर योजना राबवून नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन द्या. शहरी प्रधानमंत्री आवास योजनांचे घरकूल वाटप कर्ज तसेच कागदपत्राअभावी प्रलंबित आहे, त्याबाबत बँकाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लाभार्थ्यांना घरकुलाचे तत्काळ वाटप करा, असे खा. महात्मे यांनी सांगितले.

अनेक लाभार्थी कर्ज न मिळाल्याने आपले घरकूल दुसऱ्यांना विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत त्यांना प्रतिबंध करा. गरीबगरजु लाभार्थ्यांना शहरात राहण्याची सोय व्हावी, या उद्देश्याने हे घरकूल त्यांना वाटप करण्यात आले आहे, याची जाणीव ठेवून त्यांनी कमीत कमी 15 वर्ष हे घरकूल विकू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.

राष्ट्रीय सामाजिक अर्थ सहाय्य योजनेंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन, दिव्यांग निवृत्तीवेतन व कुटुंब अथसहाय्य योजनेचा प्राथम्याने वृध्द, व दिव्यांगाना द्या असे ते म्हणाले.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकूल वाटपाच्या अडचणीवर मार्ग काढण्याच्या सूचना आमदार कृष्णा खोपडे यांनी केल्या. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगाबाबत तंबाखुमुक्त अभियांनाची युवक, युवतींमध्ये विस्तृत जनजागृती करण्याच्या सूचना सदस्य श्री. बोरीकर व श्री. उके यांनी यावेळी केल्या.

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना,पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोविड-19 अंतर्गत लसीकरण, ॲक्टीव्ह रुग्ण, मृत्यु व बरे झालेले रुग्णांचा आढावा, बेड, दोन्ही व्हॅक्सीनेश डोस,बुस्टर डोस, ऑक्सीजन प्लांट, जननी सुरक्षा योजना, अंगणवाडी, शाळेतील मुलांच्या तपासणी, सिकलसेल, जिल्ह्यातील अशा सेविका, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जिल्हा मानसिक स्वास्थ कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजीटल इंडिया, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत कामे, राष्ट्रीय कृषी विकास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, परंपरागत कृषी विकास योजना, मृदा आरोग्य कार्डराष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, ई-राष्ट्रीय कृषी बाजार, प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, खादी ग्रामोद्योगच्या योजना आदी योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.