नागपूर : जरीपटका पोलिस ठाण्यासमोरील खोब्रागडे चौकात सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली.अमन नियाजुद्दीन शेख असे मृताचे नाव आहे. जो आदर्श नगर बडा ताजबागचा रहिवासी होता. तर रमेंद्रसिंग दौलत परिहार (रा. वाडी) असे आरोपी कारचालकाचे नाव आहे.
अमन त्याचे तीन मित्र अरमान कुरेशी, आतिफ पठाण आणि इनायत पठाण यांच्यासोबत जरीपटका परिसरातील नूरी मशिदीजवळ राहणाऱ्या त्याचा नातेवाईक इम्रान कुरेशी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला होता.सोमवारी पहाटे कार्यक्रम आटोपून हे चौघे मित्र त्यांच्या ज्युपिटर गाडीने घरी परतत होते. यादरम्यान खोब्रागडे चौकात स्कॉर्पिओ चालकाने दुचाकीला धडक दिली.
या अपघातात वाहन चालकाने दुचाकीस्वार चार तरुणांना 100 मीटर अंतरापर्यंत ओढून नेले या अपघातात अमन याचा मृत्यू झाला.
तर इतर तीन तरुण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर स्कॉर्पिओ चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, मात्र काही वेळाने पोलिसांनी आरोपीला शोधून अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.