
नागपूर: पंतप्रधान आवास योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अनेक नागरिकांनी यासाठी अर्ज केले आहे. त्यासंदर्भात नेमके काय सुरू आहे, याची माहिती वेळोवेळी समितीला देण्यात यावी आणि प्रक्रियेला वेग देण्यात यावा, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती चेतना टांक यांनी दिले.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात बुधवारी (ता. १०) आयोजित समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला सभापती चेतना टांक यांच्यासह उपसभापती वंदना यंगटवार, सदस्य सुनील हिरणवार, मनोज सांगोळे, स्नेहा निकोसे उपस्थित होते.
बैठकीत डी.पी. रस्ते व अन्य प्रकल्पांतर्गत महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास कामांमुळे किती घोषित झोपडपट्टीतील झोपडपट्टीवासीय बाधीत होत आहेत, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान आवास योजना आणि घरकुल योजनांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. या योजनेअंतर्गत ज्या लोकांनी अर्ज केले आहे, त्यांना प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती हवी असते. यासाठी ते नगरसेवकांशी संपर्क साधतात. मात्र, अपुऱ्या माहितीमुळे लोकांना योग्य माहिती नगरसेवकही देऊ शकत नाही. त्यामुळे यापुढे अधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवड्याला प्रकल्पाच्या प्रगतीचा अहवाल समितीला द्यावा, असे निर्देश देत समिती सदस्य प्रत्येक आठवड्याला प्रकल्पस्थळाची पाहणी करतील, अशी माहिती दिली.
बैठकीला अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी गैरहजर असल्यास समिती सदस्यांना योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे पुढील बैठकीपासून प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी न चुकता उपस्थित राहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
			







			
			