Published On : Fri, Jun 30th, 2017

ओला-सुका कचरा वर्गीकरण मोहिमेला वेग द्या

Sandeep Joshi
नागपूर: ओला आणि सुका कचरा निर्मितीस्थळापासून वेगळा करणे, हे आता बंधनकारक आहे. त्यासाठी नागपूर महानगरपालिकेने हिरव्या आणि निळ्या कचरापेट्या वाटपाचे जे धोरण ठरविले आहे त्याच्या अंमलबजावणीला वेग द्या. जिथे अडचणी येत आहेत तिथे पदाधिकारी आणि आयुक्तांशी बोलून त्या दूर करा. पहिल्या टप्प्यात ३१ जुलैपर्यंत नागपूर शहरातील ३० टक्के भागातून पूर्णपणे ओला आणि सुका कचरा वर्गीकृत व्हायलाच हवा, त्या दृष्टीने तातडीने कामाला लागा असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५ जूनपासून ओला आणि सुका कचरा निर्मितीस्थळापासूनच वर्गीकृत करण्याच्या मोहिमेला सुरूवात झाली. या मोहिमेचा झोननिहाय आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला महापौर नंदा जिचकार यांच्यासह सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, प्रतोद दिव्या धुरडे, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे उपसभापती प्रमोद कौरती, अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, स्वच्छ भारत मिशनमधील सल्लागार डॉ. अशोक उरकुडे आणि सर्व झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.

ओला आणि सुका कचरा वर्गीकरण मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर प्रत्येक झोनला एक हजार कचरा पेट्यांच्या जोड्या पुरविण्यात आल्या होत्या. त्यापैकी दहाही झोन मिळून केवळ २३०० कचऱ्यापेट्यांचे वाटप झाले असल्याची माहिती सहायक आयुक्तांनी दिली. कचरा पेटी मागणीची ऑनलाईन नोंदणी ही त्यातली मुख्य अडचण असल्याचे सर्व सहायक आयुक्तांनी सांगितले. ३१ जुलै पर्यंत शहरातील ३० टक्‍के भागात ही मोहीम यशस्वीपणे सुरू करायची असेल तर प्रत्येक घरापर्यंत कचरापेट्या पोहचायला हव्या, असे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सुचविले. यावर आयुक्त अश्विन मुदगल यांनी वेग वाढविण्यात येत असलेल्या अडचणींवर चर्चा केली. प्रत्येक झोनच्या सहायक आयुक्तांनी झोनल अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांसोबत चर्चा करून दोन दिवसांत संबंधित झोनमधील ३० टक्के भाग निश्चित करावा. ऑनलाईन नोंदणीची अट शिथील करून निश्चित केलेल्या भागात कचऱ्यापेट्यांचे तातडीने वितरण करावे. हे वितरण करतानाच कनक रिसोर्सेसने त्याच भागात ओला आणि सुका कचऱ्याची स्वतंत्रपणे उचल करण्याच्या दृष्टीने गाड्यांची व्यवस्था करावी, असे निर्देश दिले. ‘कनक’चा जो कर्मचारी कामात हलगर्जीपणा करीत असेल, लोकांना पैसे मागत असेल किंवा मद्यप्राशन करून कचरा संकलनाकरिता घरोघरी जात असेल, अशा कर्मचाऱ्यांना तातडीने कामावरून कमी करण्याचे निर्देशही त्यांनी कनक रिर्सोसेसचे कमलेश शर्मा यांना दिले.

Advertisement

ओला आणि सुका कचरा विलगीकरण हे आता मनपाचे धोरण आहे. त्याची अंमलबजावणी करायचीच आहे. या धोरणाशी कुठल्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विसंगत वागता कामा नये, असे आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. अनेक ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजार, नियमित बाजार आणि फुटाळ्यासारख्या सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळीसुद्धा कचरा उचल करण्याची व्यवस्था ‘कनक’ने तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, हा विषय अधिकाऱ्यांना गांभीर्याने घ्यावा लागेल. हा उपक्रम स्त्युत्य असून नागरिक या उपक्रमाचे स्वागत करीत आहे. पण मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना स्वत: लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. आयुक्तांनी दिलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी तातडीने करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.

बैठकीला सर्व सहायक आयुक्तांसह आरोग्य विभाग (स्वच्छता)चे झोनल अधिकारी, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement